नगर :  आमदार संग्राम जगताप व अनिल राठोड यांच्यातील संघर्ष भडकला  - MLa Sangram Jagtap vs Anil Rathod Nagar Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

नगर :  आमदार संग्राम जगताप व अनिल राठोड यांच्यातील संघर्ष भडकला 

मुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 जानेवारी 2018

विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शहरात माजी आमदार अनिल राठोड हेच उमेदवार असतील, हे जवळजवळ निश्चित आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसकडूनही आमदार संग्राम जगताप यांनाचा उमेदवारी मिळेल, हे दिसून येते. त्यामुळे साहजिकच दोन्हीही नेते एकमेकांवर चिखलफेक करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

नगर :  शहरातील प्रत्येक कार्यक्रमात एकमेकांवर चिखलफेक करण्याचा सपाटा चालविलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यातील कलगितुरू पुन्हा रंगू लागला आहे. 

दोन्हीही नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकत्याच एका रस्त्याच्या कामाच्या डांबरीकरणाच्या वेळी राठोड यांनी जगताप यांच्यावर टीका करीत घोटाळा करणारेच घोटाळ्याची चाैकशीची मागणी करतात, हे हास्यास्पद असल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेतील चाळीस लाखांचा गैरव्यवहार या नेत्यांच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेत दोन प्रभागांमध्ये पथदिव्यांच्या उभारणीत चाळीस लाखांचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला. संबंधितांनी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करीत ही रक्कम लाटली. त्याच्याशी कामात कुचराई करणाऱ्या सहा अभियंते व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केले. हा गैरव्यवहार आमदार जगताप यांच्या सांगण्यावरूनच झाला असल्याचा आरोप सत्ताधिकारी शिवसेनेने केला. 

तर सत्ताधारी शिवसेनाच या प्रकाराला कारणीभूत आहे, त्यामुळे त्यांची चाैकशी व्हावी अशी मागणी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावरून सुरू असलेले रणकंद अद्याप शांत झालेले नाही. या प्रकरणावरून शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे.

आमदार जगताप यांनी या प्रकरणाच्या चाैकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत असून, त्यांनी संबंधितांच्या विरोधात फिर्याद देण्याची गरज होती. पण ती त्यांनी दिली नाही. महापालिकेत सध्या घोटाळे झाकण्याचेच प्रकार होत आहेत.

यापूर्वीही बाकडे खरेदीच्या गैरव्यवहारावर पडदा टाकला. मोठ्या कामांमध्ये चांगलेच लागेबांधे तयार होऊन निविदा तात्काळ मंजूर होते. या सर्व प्रकारामागे बड्या राजकीय मंडळींचा हस्तक्षेप होतो. त्याशिवाय असे कामे होऊ शकणार नाहीत, असे जगताप यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

आमदार जगताप यांच्या आरोपांना उत्तर देताना राठोड यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेना कधीच भ्रष्टाचार करीत नाही. त्यामुळेच मी पाच वेळा आमदार होतो. इतर पक्षासारखी शिवसेना थापा मारत नाही. ज्या वेळी नगरमध्ये शिवसेनेची सत्ता येते, त्यावेळी शहरात चांगले कामे होत असतात.

आजपर्यंत विरोधकांनी शिवसेनेच्या कामांचेच उदघाटने केली. गेल्या वीस वर्षांपासून काही रस्त्यांनी डांबरच पाहिले नव्हते, तेथे डांबरीकरण शिवसेनेच्या काळातच सुरू आहेत. घोटाळे करणारेच घोटाळ्यांची मागणी करीत असतील, तर त्याला काय म्हणावे, अशा शब्दांत राठोड यांनी टीका केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख