MLA Sambhuraje Desai warns officers to perform or face the music | Sarkarnama

रिझल्ट दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा : शंभूराज देसाई

सरकारनामा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मॅरेथॉन बैठक संपल्यानंतर तहसिल कार्यालयात वैयक्तिक कामांकरीता आलेल्या सुमारे दोनशेहून अधिक नागरीकांनी त्यांच्या समस्या आमदार शंभूराज देसाईंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याही कामांची दखल घेऊन तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून त्या समस्या सोडवून घेतल्या.

सातारा : " कराड-चिपळूण मार्गाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून या मार्गावर पडलेले खड्डे आठ दिवसांत भरुन घ्या. नुसते हो ला हो..नको, तर  रिझल्ट दाखवा. अन्यथा, कारवाईला सामोरे जा," असा सज्जड दम पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी महामार्गाचे अधिकारी आणि हे काम घेतलेल्या  कंपनीच्या अधिकाऱ्यांना भरला.  

आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तहसिल कार्यालयात तालुक्‍यातील विविध प्रश्‍न व विषयासंदर्भात मॅरेथॉन बैठका घेतल्या. यामध्ये विविध विषयावर चर्चा करुन त्यांनी तातडीने निर्णयही घेतले.

कराड-चिपळूण रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कराड ते घाटमाथापर्यंत पडलेले मोठमोठे खड्डे येत्या आठ दिवसांत भरुन घेण्याच्या तसेच रस्त्याच्या कामांस गती देण्याच्या सूचना केल्या. "नुसते हो ला हो नको तर रिर्झल्ट दाखवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा," असा इशारा आमदार देसाईंनी महामार्गाचे अधिकारी आणि हे काम घेतलेल्या  कंपनीच्या अधिकाऱ्यांना   दिला.

जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत अभियान, पाटण बसस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरुवात करण्यासंदर्भात बैठकी झाल्या. सुमारे चार तास या बैठका झाल्या. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, महामार्गाचे कार्यकारी अभियंता कांडगांवे, उपअभियंता पन्हाळकर, एलऍण्ड टी कंपनीचे प्रोजेक्‍ट मॅनेजर श्री.घोष,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजाराम खंडागळे, नाईक, आदी उपस्थिती होती.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख