MLA Sadanand Chavan says I will complete hat trick In elections | Sarkarnama

आमदार सदानंद चव्हाण म्हणतात विजयाची हॅट्रिक  साधणारच

मुझफ्फर खान
रविवार, 23 सप्टेंबर 2018

मला मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. शिवसेनेत प्रत्येकाला न्याय दिला जातो. आज नाही तर उद्या कधीतरी माझा नंबर येईल.

-आमदार सदानंद चव्हाण

 

चिपळूण :  " चिपळूण विधानसभा मतदार संघातून तिसर्‍यांदा निवडून येण्याची संधी मतदारांनी कुणालाही दिली नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपबरोबर युती झाली नाही तरी स्वबळावर लढणार आणि विजयाची हॅट्रीक साधणार," असा विश्‍वास आमदार सदानंद चव्हाण यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला. 

ते म्हणाले, " शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आर्शिवाद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात शिवसेना रूजविण्याचे काम केले. लयास गेलेली संघटना पुन्हा एकदा भरभक्कमपणे उभी केल्यानंतर चिपळूण- संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी माझ्यावर विश्‍वास टाकून दोनवेळा सेवा करण्याची संधी दिली. केलेल्या कामाचा मी कधीही डांगोरा पिटत नाही. मात्र विधीमंडळात मतदारसंघातील प्रश्‍न नेमकेपणाने मांडून विकास कामे करण्यात मी कुठेही कमी पडलो नाही. "

 आमदार सदानंद चव्हाण  पुढे म्हणाले , "माझ्या स्थानिक विकास निधीतून मतदार संघात कोट्यवधी रुपयाची कामे केली. खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तसेच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मतदार संघासाठी कोट्यवधीचा निधी दिला. सत्तेचा उपयोग करून शासनाच्या प्रत्येक योजनांच्या माध्यमातून निधी आणण्यात मी कुठेही कमी पडलो नाही. निवडून आल्यानंतर मी मतदारांना पाठ दाखवली नाही. सतत त्यांच्या सुख-दुखात सामील झालो. मतदार संघातील शिवसैनिक आणि सुज्ञ मतदारांचा जोवर माझ्यावर विश्‍वास आहे तोवर या मतदार संघाचा मीच आमदार असणार आहे." असे ठामपणे त्यांनी सांगितले. 

राज्यात शिवसेना भाजपबरोबर सत्तेत आहे. तुम्ही ज्येष्ठ आमदार असूनही मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. महामंडळाचे वाटप करतानाही डावळले गेले या विषयावर विचारले असता चव्हाण म्हणाले," मला मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. शिवसेनेत प्रत्येकाला न्याय दिला जातो. आज नाही तर उद्या कधीतरी माझा नंबर येईल.". 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख