mla ruturaj patil become father of baby boy | Sarkarnama

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या घरात आनंदाची गुढी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

ऋतुराज यांच्या पत्नी सौ. पुजा यांनी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात एका गोंडस बाळाला काल (ता. 25) जन्म दिला. आई आणि बाळाचीही प्रकृत्ती उत्तम आहे.

कोल्हापूर : राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील आजोबा झाले आहेत. वाचून जरा आश्‍चर्य वाटले असेल पण होय ही बातमी खरी आहे, त्यांचे पुतणे आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज यांना गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पुत्ररत्न झाले आहे. या घटनेने  बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.

ऋतुराज यांच्या पत्नी सौ. पुजा यांनी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात एका गोंडस बाळाला काल (ता. 25) जन्म दिला. आई आणि बाळाचीही प्रकृत्ती उत्तम आहे. आमदार ऋतुराज पाटील हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यात याच रूग्णालयात थांबून होते. आमदार ऋतुराज यांच्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनीच पाटील कुटुंबियांची ही गोड बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली आहे. त्यावर ऋतुराज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन हातात हात घालून रस्त्यावर उतरले आहे. त्यात जिल्ह्याचे पालकंमत्री सतेज पाटील हे गेल्या 14 दिवसांहून अधिक काळ प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या कामासाठी पोलीस बंदोबस्त, वाहनांचा ताफा नाकारला आहे. फक्त चालक आणि ते स्वतःच दिवसभर गाडीतून फिरतात ते स्वतःच्या कार्यालयात न बसता जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांनी ठाण मांडले आहे. राज्यात इतर मंत्री आणि आमदार, खासदार 'वर्क फ्रॉम होम' करत असताना श्री. पाटील मात्र मैदानात उतरून लोकांची सेवा करत आहे. अशा धावपळीतच त्यांना पुतणे ऋतुराज यांना मुलगा झाल्याची बातमी काल दुपारी समजली. कुटुंबियांनाही याची माहिती दुपारीच समजली. गुढी पाडव्यासारख्या महत्त्वाच्या सणाला या गोड बातमीने या कुटुंबाचा आनंदाला पारावर उरला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख