आमदार सातपुते म्हणाले, हे भूमी अभिलेख कार्यालय आहे की दारूचा गुत्ता ? 

भूमी अभिलेख कार्यालयात आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे .
ram-satpute
ram-satpute

 नातेपुते:  माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयात नकला, नकाशे व इतर कामांसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हे भूमी अभिलेख कार्यालय आहे की दारूचा गुत्ता , असा जाब त्यांनी विचारताच अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.


आमदार सातपुते यांचे नवीन जबादारी आल्यानंतरच हे पहिलेच ऑपरेशन आहे . भूमी अभिलेख कार्यालयात आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे . 

आमदार सातपुते म्हणाले, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये विविध कामांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावरून या कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यात गैर काय ? 


अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नकाशाच्या नकला देण्यासाठी तीन हजारांची मागणी केल्याची पिरळे येथील लक्ष्मण कीर्दक यांची तक्रार होती . त्यामुळे सातपुते चांगलेच भडकले. बुधवारी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले .

 दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास गप्प बसणार नाही. तुम्हाला याचा जाब द्यावा लागेल, परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. 


तुम्हाला पगार मिळत नाही का? हे कार्यालय दारूच्या धंद्याप्रमाणे चालवू नका, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ज्यांना जबाबदारीने नीट काम करता येत नाही, त्यांनी बदल्या करून घ्याव्यात, असेही त्यांनी सुनावले.


माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयात ज्ञानेश्‍वर शिंदे उपाधीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. ते आठवड्यातून एकदाच कार्यालयात येतात, असे मुख्यालय सहायक ऊर्मिला पवार यांनी आमदार राम सातपुते यांना सांगितले. नंतर त्यांनी उपाधीक्षक शिंदे यांना संपर्क केल्यावर आपण आठवड्यातून दोन वेळा कार्यालयात असतो, असे शिंदे यांनी त्यांना सांगितले. 


मुख्यालय सहायक उपाधीक्षक कार्यालयात एकच दिवस हजर असतात असे सांगतात तर अधीक्षक आठवड्यातून दोन दिवस हजर असतो असे म्हणतात. अधिकाऱ्यांच्या या परस्परविरोधी विधानातून विसंगती आढळून आली.

  प्रभारी उपाधीक्षक ज्ञानेश्‍वर शिंदे यावेळी म्हणाले ,    माझी माढा तालुक्‍यासाठी नेमणूक आहे. आठ महिन्यांपासून माळशिरसचा अतिरिक्त पदभार आहे. शुक्रवारी याची नेमकी माहिती घेणार आहे. माळशिरसला जास्तीत जास्त वेळ देऊन कारभारात सुधारणा करू.

मुख्यालय सहायक ऊर्मिला पवार म्हणाल्या , लक्ष्मण कीर्दक यांनी नकला मिळवण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार केली आहे. परंतु त्यांच्याकडे नेमके कोणी पैसे मागितले, हे त्यांनी सांगितले नाही. अशा मोघम व अर्थहीन तक्रारी बरोबर नाहीत. ज्यांनी पैसे मागितले, त्यांच्या नावासह त्यांनी तक्रारी केल्या पाहिजेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com