अशोक पवारांनी "घोडगंगे'चा "यशवंत' केला : आमदार बाबूराव पाचर्णे यांची टीका

शिरूर-हवेलीतील बहुतेक संस्थांवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाबूराव पाचर्णे यांनी बाजी मारली खरी. तरी गेल्या काही दिवसांत शिरूरच्या बहुतेक निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीच वरचढ ठरली आहे. त्यामुळे पाचर्णे यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत काही खरे नाही, असा प्रचार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू आहे. याबाबत पाचर्णे यांची सडेतोड मुलाखत...
अशोक पवारांनी "घोडगंगे'चा "यशवंत' केला : आमदार बाबूराव पाचर्णे यांची टीका

प्रश्न : तुम्ही 2014 मध्ये पुन्हा आमदार झाला. पण त्यानंतर भाजपला एकाही स्थानिक निवडणुकीत भव्य असे यश मिळाले नाही. याचे कारण काय असावे? 

पाचर्णे : तालुक्‍यातील संस्थांवर भाजप पूर्वीपासूनच फारशी सत्तेत नव्हतीच. शिरूर नगरपालिकेत यावेळी भाजपाचे अधिकृत दोन तर समर्थन दिलेले दोन असे चार नगरसेवक आहेत. तिथे राष्ट्रवादीचे नगरसेवकच नाहीत आहे ते सर्व विकास आघाडीचे. या शिवाय पंचायत समितीत पूर्वीइतकेच तीन सदस्य, बाजार समितीत चार संचालक, खरेदी-विक्री संघ निवडणुकीत तीन संचालकांना भाजपने समर्थन दिले आहे. "घोडगंगा' सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही जोमाने लढलो. मात्र अशोक पवार यांना "व्यंकटेश' या त्यांच्या खासगी कारखान्याच्या मदतीसाठी "घोडगंगा' ताब्यात ठेवणे गरजेचे होते. त्यांनी साम-दाम-दंड भेद सर्व त्यांनी वापरले आणि ती निवडणूक जिंकली. एकंदर तालुक्‍यात भाजपची स्थिती घसरली नाही तर ती स्थिर आहे. 

प्रश्न : शिरूर तालुका दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेल्याचा फटका येथील कार्यकर्त्यांना बसत आहे, असे माजी आमदार अशोक पवार म्हणतात. याबाबत आपण काय सांगाल? 

पाचर्णे : माझ्या सन 2004 ते 09 या माझ्या आमदारकीच्या पहिल्या कार्यकालानंतर लगेच मतदारसंघ पुनर्रचना झाली. ही पुनर्रचना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाली. त्यास विरोधात मी न्यायालयात गेलो होतो. मात्र माझा विरोध टिकला नाही. सन 2009-14 च्या निवडणुकीत अपघाताने अशोक पवार शिरुर-हवेलीचे आमदार झाले. मात्र मतदारांनी आपली चूक दूरुस्त करीत मला शिरुर-हवेली मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून 2014 मध्ये पुन्हा विधानसभेत पाठविले. मतदारसंघ पुनर्रचना तालुक्‍यासाठी अन्यायकारक असल्याचे माजी आमदार अशोक पवार आत्ता म्हणून लागले आहेत. मात्र पुर्ररचना समितीत सदस्य म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील हेच समितीत होते. मग त्यावेळी अशोक पवार मूग गिळून गप्प का होते? त्यामुळे पुनर्रचनेला त्यांचा विरोध खरा की खोटा हे कळत नाही. मात्र आंबेगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या शिरूरमधील 39 गावांमुळेच त्यांना "घोडगंगा' व बाजार समिती निवडणूकीत यश मिळाले. हे त्यांना विसरु नये. 

प्रश्न : घोडगंगा कारखाना थेऊर येथील "यशवंत'च्या दिशेने निघालाय, असा जाहीर आरोप तुम्ही करत आहात. त्याचे कारण काय? 


पाचर्णे : "घोडगंगा' हा एकच कारखाना शिरूर तालुक्‍यात होता तोपर्यंत त्याचा कारभार ठिक होता. मात्र माजी आमदार अशोक पवार परिवाराचा थेट संबंध असलेला "व्यंकटेश' हा खासगी साखर कारखाना तालुक्‍यात सुरू झाला आणि "घोडगंगे'ला त्यांनी घरघरच लावलीय. कारण कारखान्यावर सहवीजनिर्मिती प्रकल्पासह एकूण 400 कोटींचे कर्ज, कामगारांचे थकू लागलेले पगार, शासनाच्या वीजखरेदी कराराबाबत चालढकल आणि तालुक्‍यात ऊसक्षेत्र वाढत असताना गाळप मात्र निम्म्यावर आले आहे. हे सगळेच गंभीर आहे. अशा स्थितीत "व्यंकटेश'कडून उसाला चांगला भाव देत घोडगंगा अडचणीत आणायचे प्रकार सुरू झालेत. सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीत "यशवंत' कारखाना हा "घोडगंगा'सारखा चांगला करुन दाखवू असे म्हणणारे अशोक पवार यांनी "व्यंकटेश'साठी "घोडगंगा'आता "यशवंत'सारखा करुन दाखवायला सुरूवात केलीय. त्यांनी घोडगंगा कार्यक्षेत्रातला ऊस "व्यंकटेश'ला फिरविला. दरवर्षी पाच लाख मेट्रीक टन गाळप असलेला कारखाना यावर्षी जेमतेम 2 लाख 70 टन मेट्रीक टनापर्यंतच अडकला. कमी गाळप म्हणजे नफा कमी आणि कारखाना तोट्यात जाणार. कारखाना तोट्यात म्हटले की, त्याचा बाजारभावाला फटका आणि हा फटका कार्यक्षेत्रातल्या ऊसाला इतर कारखान्यांकडे जाण्याला कारणीभूत ठरणार. म्हणजेच "घोडगंगा'ला घरघर आणि "व्यंकटेश'ची भरभराट, असाच प्रकार तालुक्‍यात सुरू झाल आहे. 

प्रश्न : आपल्याच काळात चासकमान धरणाच्या आवर्तनाच्या बाबतीत अनियमितता होवून पिकांच्या नुकसानी झाल्याची टीका होत आहे... 


पाचर्णे : उलट पवार यांच्या काळात चासकमानच्या 40 टक्के गळती रोखायला एक दिमडी आणता आली नाही. मी सर्वांना सोबत घेवून शिक्रापुरात बैठक घेवून पाणी आवर्तन ठरविले आणि ते एक वर्ष चांगले चालले. त्या बैठकीला यायचे टाळून आंदोलनांची भाषा करीत पूर्व व पश्‍चिम अशी शेतकऱ्यांमध्ये मोठी दरी निर्माण करण्याचे मोठे पाप माजी आमदारांनी केले आहे. "टेल टू हेड' हा कायदा बदला म्हणताना हा कायदा राज्यातील सर्व प्रकल्पांना सारखा असतो आणि तो त्यांच्याच आघाडी सरकारने केला आहे. या प्रश्नी त्यांचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत महिनाभरापूर्वी पुण्यातील बैठकीवेळी मूग गिळून बसले. बाहेर आले की बोलू लागले, हीच त्यांची कार्यशैली आहे. त्यामुळे चासकमानवर बोलून शेतकऱ्यांमध्ये वाद लावल्याशिवाय त्यांना राजकारण तरी कसे साध्य होणार हो? घोडगंगाला घरघर, शेतकऱ्यांत वाद यामुळे शिरूरमधील शेतकऱ्यांचे हाल अशोक पवारांमुळे होत आहेत. 

प्रश्‍न : आपल्या तीन वर्षांच्या कार्यकालात दिसणारी विकासकामे झालीच नसल्याचे माजी आमदार अशोक पवार म्हणत आहेत. याबाबत काय सांगाल? 


पाचर्णे : सन 2009 मध्ये मी 65 कोटींची कामे मंजूर करुन पायउतार झालो होतो. तीच कामे स्वत:च्या नावावर माजी आमदार अशोक पवार यांनी खपविली. मी सन 2014 मध्ये दुस-यांदा आमदार झाल्यावर पवार यांची त्यांच्या कार्यकालातली अर्धवट मंजूर कामे मी पूर्ण केली. आंधळगाव-मांडवगण रस्ता, शिरुर नगरपरिषद हद्दीतील सहा कोटींचा रस्ता, तालुक्‍यातील अनेक प्रशासकीय इमारती आणि पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालयांची फर्निचरशिवाय तशीच असलेली अर्धवट कामे हीच त्यांची कामाची पद्धत होती. अशोक पवार यांनी त्यांच्या पाच वर्षात केवळ 450 कोटींची कामे केली ते म्हणतात. मी केवळ तीन वर्षात त्यांच्या पाचपट म्हणजेच जवळपास दोन हजार कोटींची करुन दाखविली. हे सारे मी लेखी अहवालात देणार आहे. या अहवालाची पहिली प्रत त्यांना द्यायची, असे सर्व भाजपाचे सर्व कार्यकर्ते आता म्हणू लागलेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक पवार अपघाताने निवडून आले. असे "अपघात' वारंवार होत नसतात. हे त्यांनी लक्षात घ्यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com