आमदार नरेंद्र पाटील यांचा फंडा : एका दगडात नव्हे तर एका झाडावर दोन पक्षी !

उत्सूकता शिगेलामाथाडी कामगारांच्या मेळाव्याच्या निमीत्ताने नवी मुंबईत पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री व स्थानिक आमदारांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईक उपस्थित असणार आहेत. त्यामुळे पवार व फडणवीस हे त्यांच्या भाषणात काय बोलतात याची सर्व माथाडी कामगारांना उत्सूकता लागली आहे.
pawar-patil-fadanvis-
pawar-patil-fadanvis-

नवी मुंबई    : माथाडी कामागारांचे आराध्य दैवत आण्णासाहेब पाटील यांचे सुपूत्र  आमदार नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असताना पुन्हा एकदा त्यांनी नवी राजकीय खेळी खेळली आहे.आण्णासाहेब पाटील यांच्या 84व्या जयंतीच्या निमीत्ताने आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीला 50 वर्षे झाल्याबद्दल सत्कार आयोजित केला आहे . पण सत्कार करण्यासाठी त्याने बोलावले आहे   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना !

या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपशी जवळीक साधल्यामुळे पक्षातून ओढावलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून होणार आहे. तर पुन्हा एकदा फडणवीस यांच्याशी जवळीक साधून  माथाडी कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

मागील वर्षापासून नरेंद्र पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. यात 2016ला आण्णासाहेबांच्या 83व्या जयंती निमीत्त नवी मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावून शिक्कामोर्तब केला होता. तर माथाडी कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्यास काहीही करण्याची तयारी दाखवून आपल्याला भाजपमध्ये घ्यायचे असेल तर माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील अशी आपली अट  त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितली होती . 

पाटील यांची भाजप नेत्यांशी सलगी वाढल्यानंतर   पाटील यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांकडून दबाव वाढला होता. त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा म्हणून अनेकदा अप्रत्यक्षरित्या ताकीद  देखील दिली होती. म्हणून पाटील यांचा पक्षातील वावर देखील कमी झाला होता. तर मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांसोबतची जवळीक वाढलेली होती आणि आहे. अगदी गणेशोत्सवातही फडणवीस यांनी पाटील यांच्या घरी गणेश दर्शनाला येऊन त्याची प्रचिती दिली. 

मात्र  आमदार  पाटील यांनी शरद पवार यांच्या  सत्काराचे आयोजन  करून पक्षांतर्गत विरोधकांच्या कारवायांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे .  यामुळे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  परतीचे दोर देखील शाबूत राहणार आहेत.

 शुक्रवारी माथाडी भवनात आयोजित केलेल्या पत्राकर परिषदेत पाटील यांनी 25 तारखेला होणारा कार्यक्रमा बद्दलची भूमिका बोलून दाखवली. एका दगडात दोन पक्षी नाही तर एका झाडावर दोन पक्षी आणण्याचा माझा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. 

माझा केंद्रबिंदू माथाडी कामगार आहे, त्याच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन असे पुनरूच्चार करून पाटील यांनी पुन्हा  आपले तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे दाखवून दिले . माथाडी कामगारांच्या मेळाव्यानंतर आपण पुन्हा संघटना बांधण्यास सुरूवात करणार असून आपल्या सोबत असलेल्याची मोट ही तयार करणार असल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

सर्व पर्याय खुले ठेवण्याचे डावपेच 
आमदार नरेंद्र पाटील यांची धडपड आपल्यासमोरचे सर्व पर्याय अखेरपर्यंत खुले ठेवण्याची आहे . माथाडी कामगारांचे पाठबळ हे त्यांचे भांडवल आहे . त्याजोरावर भाजपमध्ये सन्मानपूर्वक आपल्याला निमंत्रण मिळावे असा त्यांचा प्रयत्न असावा . त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांशी थेट संबंध ठेवून आहेत .

मात्र त्यांना आमदारकीची टर्म देखील पूर्ण करायची आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे संबंध फारसे घनिष्ट नाहीत . पण राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची मर्जी कायम  राहावी यासाठी देखील पाटील प्रयत्नशील दिसतात .  विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात भाजपची परिस्थिती भक्कम असेल तर तिकडे उडी मारता यावी आणि भाजपसाठी अनुकूलता कमी झाली  तर राष्ट्रवादीतील आपले आसन कायम   राहावे यासाठी आमदार पाटील एकाचवेळी दोन्ही पक्षांशी संबंध कायम राहावेत अश्या प्रयत्नात दिसतात . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com