आमदार नमिता मुंदडा यांचा खड्डेमुक्त रस्त्यांसाठी  पुढाकार

आमदार नमिता मुंदडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. सी. पाटील यांच्याकडे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली.
namita-mundada
namita-mundada

अंबाजोगाई :  मागील काही महिन्यांत शहरातून जाणारे सर्व राज्यमार्ग खड्ड्यांमध्ये हरवले आहेत. मात्र, लवकरच नागरिकांची या खड्ड्यांपासून मुक्तता होणार आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला असून सोमवारी (ता. 18) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांसोबत त्यांनी चर्चा करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.

येत्या सोमवारपर्यंत हे सर्व खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे यावेळी शाखा अभियंता पी. सी. पाटील यांनी सांगितले.

शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावर यशवंतराव चव्हाण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वाराती रुग्णालय ते संत भगवान बाबा चौक या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

त्यातच मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. याबाबत नागरिकांतून तक्रारी वाढल्या होत्या. याच मार्गावर सर्व प्रमुख शाळा, महाविद्यालये आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असल्यामुळे हे ठिकाण प्रचंड वर्दळीचे आहे. त्यामुळे तेथील खड्डे बुजवावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. 

काही निवेदने देण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे काणाडोळा करत निवेदनांना केराची टोपली दाखविली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. सी. पाटील यांच्याकडे हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली.

आमदार नमिता मुंदडा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पाटील यांनी येत्या सोमवारपर्यंत शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे लवकरच शहरातील प्रमुख मार्ग खड्डेमुक्त होऊन वाहनधारक आणि पादचारी यांची त्रासातून मुक्तता होईल. तसेच या कामाकडे मी लक्ष देणार असल्याचे आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com