MLA Mohan Fad resigns from Shiv sena | Sarkarnama

आमदार मोहन फड यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

सरकारनामा वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

आपण मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिफारस केलल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी बंडखोराला पाठबळ दिले. आपला त्यांच्यावरच रोष आहे. सातत्याने अपमान होत असल्याने आपण पक्षात राहणेच नको असे ठरवले आहे.

परभणी: पक्षातंर्गत राजकारणाला कंटाळून आपण शिवबंधनातून स्वतःला मोकळे करून घेत आहोत, असे सांगत पाथरीचे आमदार मोहन फड यांनी मंगळवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या मनात असलेली खदखद अखेर त्यांनी पत्रकारासमोर व्यक्त केली. 

मानवत पंचायत समितीच्या सभापती पदावरून नाराज झालेल्या आमदार मोहन फड यांनी पक्षात आपल्या शिफारशीला महत्व दिले जात नाही. आपण मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिफारस केलल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी बंडखोराला पाठबळ दिले. आपला त्यांच्यावरच रोष आहे. सातत्याने अपमान होत असल्याने आपण पक्षात राहणेच नको असे ठरवले आहे. पक्षाने दिलेला व्हीप पाळला जात नाही व त्यावर काहीही कारवाई होत नाही. पक्षाच्या संपर्क प्रमुखांनी या बाबत कसलीही ठोस भूमिका घेतली नाही. आपण आठ दिवसापासून कारवाईची वाट पाहत होतो. काल त्यांची भेट झाली. परंतू त्यांनी कसलेही उत्तर दिले नाही. 

याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी ही भेट दिली नाही. यामुळे आपण आठ दिवसापूर्वी ठऱविल्याप्रमाणे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आहोत. पक्षाच्या संपर्क प्रमुखांच्या मी गेल्या आठ दिवसापासून संपर्कात होतो. प्रत्येक भेटीत त्यांनी करू - बघु अशी भू्मिका घेतली. त्यामुळे या प्रकरणात त्यांना ही स्वारस्य दिसत नाही, असेही आमदार श्री.फड यांनी सांगितले. 

रविवारी कार्यकर्त्याचा मेळावा 
शिवबंधनातून स्वताला मोकळे करून घेतल्यानंतर पुढील राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार आहोत. त्यासाठी येत्या रविवारी (ता.२६) आपण कार्यकर्त्याचा मेळावा घेणार आहोत. त्या मेळाव्यात कार्यकर्त्याच्या विचाराने पुढील दिशा ठरविली जाईल, असेही फड यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख