mla medha kulkarni alleged statment about maratha agitation sparks a row | Sarkarnama

मराठा आंदोलन स्टंट : आमदार मेधा कुलकर्णींच्या या कथित वाक्याने संताप

उमेश घोंगडे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मराठा आंदोलनाबाबत संवेदनशीलतेने वक्तव्ये करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनही काही भाजप आमदार याबाबत उलटसुलट बोलत आहेत. पुण्यात आमदार मेधा कुलकर्णी यांनीही याबाबत अवमानकार वक्तव्ये केल्याचा आरोप करत मराठा संघटना आज आक्रमक झाल्या. एवढेच नव्हे तर भाजपच्या नगरसेवकांनीही कुलकर्णी यांचा निषेध केला.

पुणे : आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणे हा आमच्या नियोजनाचा भाग होता. सर्व आमदारांच्या घरासमोर आम्ही आंदोलने केली आहेत. मात्र आंदोलन करणारे केवळ स्टंटबाजी करीत आहेत. अशी मुक्ताफळे आमदार मेधा कुलकर्णी यांनी उधळली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलक कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. त्यातच आमदार कुलकर्णी यांच्या मुलाने शिवीगाळ केल्याने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज आमदार कुलकर्णी यांच्या कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात युवक-युवतींचा सहभाग होता. राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजातील युवक-युवती आपआपल्या पातळीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.

या आंदोलनात आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत. ही सारी परिस्थितीत असताना आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी त्याला स्टंटबाजी म्हणून संभावना करणे कितपत योग्य आहे याचा विचार आमदार कुलकर्णी यांनी करावा, असे शिंदे यांनी सांगितले. आमदारांच्या घरासमोर आंदोलन करताना केवळ घोषणाबाजी करण्यात आली. अत्यंत शांततेत आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान मेधा कुलकर्णी यांच्या या कथित वक्तव्याचे त्यांच्या पक्षातही पडसाद उमटत आहेत. त्यांच्याच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक अमोल बालकवडर यांनी आमदार कुलकर्णी यांच्या कृतीचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील मराठा आंदोलन कुशलतेने हाताळत असताना. आमदार कुलकर्णी या वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच अडचणीत आणण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत.  मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी राज्यभर रस्त्यावर आला असताना त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी आमदार कुलकर्णी यांनी आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न चालवला आहे, अशी टीका त्यांनी केली.

वाचा संबंधित बातम्या -अन्‌ आमदार मेधा कुलकर्णी यांना रडू कोसळले.... 

आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, कोथरुडमध्ये तणाव

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख