mla in mahrashtra | Sarkarnama

अंदाजपत्रकाच्या पुस्तकांकडे आमदारांचे दुर्लक्ष

संजीव भागवत: सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई ः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना विरोधकांनी गोंधळ घातला म्हणून त्यांच्यातील 19 सदस्यांचे निलंबन सरकारने केले. त्यानंतर उद्‌भवलेल्या पेचप्रसंगातच सरकारने विधानसभेत विरोधकांच्या चर्चेविनाच अर्थसंकल्प मंजूर करून घेतल्याने राज्याच्या विविध विभागातील आर्थिक तरतुदींसाठी महत्त्वाचे असलेल्या अर्थसंकल्पाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकांच्या पुस्तकांकडे दुर्लक्ष झाले आहे. अर्थसंकल्प मांडून शुक्रवारी, सहावा दिवस उलटला असतानाही अंदाजपत्रकांची पुस्तके घेणाऱ्या आमदारांची संख्या अगदी नगण्यच असल्याचे दिसून आले. 

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांसाठी अर्थसंकल्पीय विविध विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकांच्या पुस्तिका सहजगत्या मिळाव्यात म्हणून त्यासाठी विधानमंडळाच्या मागील प्रवेशद्वारासमोरच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या पुस्तिकांकडे विरोधीपक्षासह काही सत्ताधारी आमदार आणि त्यांचे पीएही फिरकत नसल्याने दिवसभरात काही विभागाची ही पुस्तके दोन-चारही घेतली जात नसल्याने अनेक विभागांच्या या कार्यक्रम अंदाजपत्रकांची पुस्तिकांची अनेक गठ्ठेच्या गठ्ठे पडून आहेत. मागील सहा दिवसात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमदारांचा काही अपवाद सोडल्यास अनेक आमदारांच्या पीएनेही या पुस्तिकांकडे पाहिलेही नसल्याचे सांगण्यात आले. 

शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची 148, मराठी भाषा विभागाची 153, उद्योग, उर्जा व कामगार विभागाची 90, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागासोबतच नियोजन विभाग(मंत्रालय) आदी विभागाची सुमारे 70 ते 80 च्या दरम्यान पुस्तिका आमदारांच्या पीएपासून ते विविध प्रकारच्या संस्था, आदी प्रतिनिधींनी घेऊन गेल्याची नोंद झाली आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्यांक विभाग, महिला व बालकल्याण आदी विभागासोबत इतर विभागांच्या या कार्यक्रम अंदाजपत्रकांच्या पुस्तिका या केवळ 10 ते 30 दरम्यानच खपल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

अर्थसंकल्पाच्या या कार्यक्रम अंदाजपत्रकांच्या पुस्तिकांमध्ये 2017-18 या आर्थिक वर्षासाठी विविध विभागाचे वार्षिक नियोजन, त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, मागील वर्षातील लेखाजोखा यांची माहिती असते. या पुस्तिकेच्या आधारेच सदस्यांना त्यातील निधीची कमतरता, आदी विषयावर सभागृहात विषय मांडता येतात. मात्र शनिवारी, (18,मार्च) वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गोंधळ घातला म्हणून त्यांच्या 19 सदस्यांचे सरकारने निलंबन केले. त्यामुळे विरोधकांनी विधानसभेतील कामकाजावरच बहिष्कार सुरू ठेवत सरकारची कोंडी केली असल्याने अर्थसंकल्पाच्या कार्यक्रम अंदाजपत्रक पुस्तकांकडे आमदारांचे दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख