खासदार कोल्हेंचा वारू आमदार लांडगे रोखणार का ?

भविष्यात खासदार कोल्हेंच्या वारूला रोखायचे कसे ही चिंता पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर, राज्यातही ताकद घटलेल्या युतीला व त्यातही शिवसेनेला अधिक सतावू लागली आहे.
खासदार कोल्हेंचा वारू आमदार लांडगे रोखणार का ?

पिंपरीः लोकसभेला चौखूर उधळलेल्या अमोल कोल्हेंच्या वारूला रोखण्यात युतीला विधानसभेलाही अपयश आले. 

परिणामी पुणे जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रवादीची प्रकृती सुधारलीच नाही, तर ती धडधाकटही झाली आहे. एवढेच नाही, तर, शिरूरला आमदारांचे समीकरण त्यांच्या करिष्म्यामुळे गतवेळपेक्षा (२१०४) नेमके उलटे झाले आहे. त्यामुळे भविष्यात खासदार कोल्हेंच्या वारूला रोखायचे कसे ही चिंता पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर, राज्यातही ताकद घटलेल्या युतीला व त्यातही शिवसेनेला अधिक सतावू लागली आहे. कारण ती आता पुणे जिल्ह्यात शून्य (आमदारकीच्या बाबतीत) झाली आहे.

डॉ. कोल्हे यांनी प्रथम शिवसेनेचा अभेद्य अशा शिरूरच्या बूरूजाला सुरुंग लावला. तेथून खासदारकीची हॅटट्रिक केलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा सहा महिन्यापूर्वी लोकसभेला पराभव केला. त्यावेळी मतदारसंघात युतीचे पाच,तर आघाडीचा फक्त एकच (आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील) आमदार होता. विधानसभेला खा. डॉ. कोल्हे यांनी हे चित्र नेमके उलटे केले. युतीचा एक, तर आघाडीचे पाच (सर्व राष्ट्रवादी) आमदार करण्यात त्यांनी आपला खारीचा मोठ्ठा वाटा उचलला. लोकसभेची मोदी लाट विधानसभेला काहीशी ओसरली. 

दुसरीकडे खा. डॉ. कोल्हेंचा करिष्मा कायम राहिला. उलट वाढला. लोकसभेला त्यांना भोसरी व हडपसरमध्ये पिछाडी होती. हडपसरमध्ये ती भरून काढीत त्यांनी तिथे राष्ट्रवादीचा आमदार (चेतन तुपे)केला. त्याजोडीने खेड (दिलीप मोहिते- पाटील), जुन्नर (अतुल बेनके),शिरूर (अशोक पवार)यांना निवडून आणले. मतदारसंघातील एकमेव शिवसेना आमदाराचा (खेडचे सुरेश गोरे) पराभव केला. शिवसेनेचे जिल्ह्यातील दुसरे आमदार पुरंदरचे विजय शिवतरे यांचाही अजित पवारांनी ठरवून पराभव केल्यामुळे जिल्हातून शिवसेना हद्दपार झाली.खा.कोल्हेंचे अमोघ वक्तृत्व आणि शिवस्वराज्य यात्रेमुळे राज्यातही पक्षाचे आमदार वाढण्यात मदत झाली. मात्र, शिरूर मतदारसंघात भोसरीत त्यांचा वारू रोखला गेला. त्याला लगाम घातला तो भाजपचे महेशदादा लांडगेंनी. ते पुन्हा निवडून आले. 

एवढेच नाही,तर त्यांनी लोकसभेची भोसरीतील आघाडी (३७ हजार) दुप्पटीहून अधिक (७५ हजार) केली.युतीपेक्षा महेशदादांच्या वैयक्तिक करिष्यामुळे ते शक्य झाले. जिल्ह्यातून सर्वाधिक लीड घेणारे ते राज्यात भाजपचे सातव्या क्रमाकांचे आमदार ठरले. परिणामी कोल्हेंचा घोडा आम्हीच रोखू शकतो असा दावा महेशदादांच्या गोटातून करण्यात आला आहे. 

एवढेच नाही,तर भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था व २०२२ ची महापालिका निवडणूकीत उधळणारा हा वारू रोखायचा असेल,तर महेशदादांसारख्या मास लिडरला मंत्रीपदाच्या रुपाने राज्यात बळ देण्याची  त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. ती मिळाली, तर नक्की कोल्हेंचा वारू भोसरीप्रमाणे शिरूरलाच नव्हे, तर जिल्ह्यासह राज्यातही रोखू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक लीडने निवडून येऊन त्यासाठी हक्कदार झालो असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच यानिमित्त शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघून पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासही मदत होणार असल्याचा त्यांची भूमिका आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com