MLA Jaikumar Gore lifestyle | Sarkarnama

रोज 300 जोर मारणारा निर्व्यसनी आमदार ! 

रूपेश कदम 
मंगळवार, 30 मे 2017

राजकारणात असूनही मी पूर्णपणे निर्व्यसनी असून, व घरचं साधं व सात्त्विक शाकाहारी जेवण सोबतीला सुकामेवा असा माझा आहार आहे. विशेष म्हणजे मी दूध पीत नाही. तणावमुक्तीसाठी दररोज किमान दहा मिनिटे योगासने करतो. शरीर बनविण्यासाठी बाहेरील सप्लिमेंटची मला कधीच आवश्‍यकता भासली नाही. व्यायाम करताना अंगातून येणारा घामच माझ्या तंदुरुस्तीचे औषध आहे. 
- जयकुमार गोरे (आमदार, माण) 

धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे अनेक समस्यांना, व्याधींना सामोरे जावे लागते. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना तर आपल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडताना कसरत करावी लागते. त्यामुळे स्वतःचे आरोग्य जपणाऱ्या कसरती करायला वेळ कधी मिळणार; पण याही परिस्थिती काही आमदार आपल्या तंदुरुस्तीने चकित करताना दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे. 

कॉलेज जीवनापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती. विशेषतः ऍथलेटिक्‍समध्ये त्यांनी नावलौकिक कमावला. शंभर मीटर धावणे व भालाफेक या स्पर्धांत त्यांनी राज्य पातळीपर्यंत झेप घेतली. या आवडीतूनच सांगली येथे तालमीत जाऊन कुस्तीचा सराव केला. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी आपली ही आवड कायम जोपासली आहे. 

जयकुमार गोरे यांची दिनचर्या सकाळी साडेपाचला सुरू होते. साडेपाचला उठल्यानंतर ताजेतवाने होऊन बरोबर सहाला ते व्यायामशाळेमध्ये पोचतात. व्यायामासाठी त्यांनी आपल्या बोराटवाडी (ता. माण) येथील बंगल्यात अद्ययावत व्यायामशाळा उभारली आहे. जिममधील मशिनवर तीन किलोमीटर चालणे व चार किलोमीटर धावण्याचा व्यायाम करतात. विविध मशिनवर चाळीस मिनिटे वर्क आउट केल्यानंतर तीनशे जोर मारतात. या दिनचर्येत शक्‍यतो बदल होत नाही. काही कामानिमित्त मुंबईत असले तरी कमीतकमी चालणे व धावण्याचा व्यायाम तरी ते करतातच. सदैव कामात राहण्याची त्यांना आवड आहे. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण झाल्यानंतर मिळणारे समाधानच टॉनिकचे काम करते, असे त्यांचे म्हणणे आहे. 

जयकुमार गोरेंची दिनचर्या : 
1. सकाळी साडेपाचला उठतात 
2. सहा वाजता जिममध्ये पोचतात 
3. जिममध्ये 40 मिनिटे वर्कऑऊट 
4. रोज तीनशे जोर मारतात 
5. दहा मिनिटे योगासने करतात 
6. रात्री मध्यम स्वरूपाचे जेवण 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख