वाळू तस्करीत माणच्या तहसिलदारांची पार्टनरशिप : जयकुमार गोरे

aykumar-gore
aykumar-gore

सातारा : शासनाने वाळूचे धोरण ठरविले नसल्याने सध्या चोरट्या पध्दतीने वाळूचा उपसा व वाहतूक सुरू आहे. माण तालुक्‍यात तर दररोज शंभर गाड्या वाळू उपसा होत असून वाळू तस्करीत माणच्या तहसिलदारांची पार्टनरशिप आहे, असा आरोप माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत केला.

सध्या वाळू उपसा व लिलाव बंद आहेत. पण तरीही दुष्काळी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात चोरटा वाळू उपसा सुरू आहे. यासंदर्भात विधानसभेच्या अधिवेशनात अनेक आमदारांनी आवाज उठविला. माणचे भाजपचे आमदार यांनी महसूल विभागावर ताशेरे ओढले.

आमदार गोरे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शासन वाळू बाबतचे धोरण ठरवत आहे. प्रत्येक वेळी महसूल मंत्री शासनाने वाळू बाबतचे धोरण बनविल्याचे सांगतात. प्रत्यक्षात धोरणाची अंमलबजावणी होत नाही. वाळूवर बंदी आहे. न्यायालयाचे निर्बंध असल्याने लिलाव होत नाहीत. लिलावासाठी ग्रामपंचायतींचा ठराव पाहिजे. असे असतानाही वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.

पूर्वी मटका, दारूचे तस्कर असायचे आता राज्यात सर्वात मोठी वाळू तस्करी झाली आहे. वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागातील काही मंडळी प्रचंड संपत्ती मिळविण्याचे काम करत आहे. यामध्ये महसूल विभागाचा मोठा हात असून काही अधिकारी ही यामध्ये सहभागी आहेत. माण तालुक्‍यात वाळूचा लिलाव झालेला नाही. तरीही दररोज नदीपात्रातून पाच ते सहा पोकलॅनच्या माध्यमातून शंभर गाड्या भरून वाळू काढली जात आहे. याबाबतची तक्रारी तहसिलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पण कोणतीही कारवाई होत नाही. याबाबतचा पुरावा म्हणून माझ्याकडे व्हिडीओ शुटींग आहे. मी स्वत: तक्रार केली. माणचे तहसिलदारांची वाळू तस्करीत पार्टनरशिप आहे. त्यासाठी महिन्याला ट्रॅक्‍टरला 50 हजार, डंपरला एक लाख, जेसीबी दोन लाख, पोकलॅन तीन लाख असा रेट ठरलेला आहे. हे पैसे महसूल विभागाकडे जातात. हे राजरोसपणे सुरू आहे. मात्र मोठ्या तस्करांवर कारवाई होत नाही पण गरिबाने घरासाठी वाळू घेतली तर कारवाई केली जाते. एक गाडी वाळू काढली की 35 ते 40 हजार रूपये मिळतात. त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांचे भागवून वाळू तस्कराला 10 ते 15 हजार रूपये मिळतात. हा खूप मोठा तस्करीचा धंदा आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे. तसेच वाळेचे लवकरात लवकर धोरण बनवावे आणि माण मधील वाळू उपशावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com