MLA Jagtap taken into police custody | Sarkarnama

आमदार जगताप पोलिसांच्या ताब्यात : कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

"जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी व मंगळवारी उपोषण करू. पाण्याचा निर्णय न झाल्यास बुधवारी (तीन मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन हजार शेतकरी आत्मदहन करतील,' असा इशारा जगताप यांनी दिला.

श्रीगोंदे :  "कुकडी'च्या पाण्यासाठी कोळगाव परिसरात "कालवा मुक्काम आंदोलन' करणारे आमदार राहुल जगताप, अण्णा शेलार, बाळासाहेब नाहाटा व 35-40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत पोलिसांना विरोध केला.

"जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी व मंगळवारी उपोषण करू. पाण्याचा निर्णय न झाल्यास बुधवारी (तीन मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन हजार शेतकरी आत्मदहन करतील,' असा इशारा जगताप यांनी दिला.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अण्णा शेलार, बाळासाहेब नाहाटा यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रातांधिकारी गोविंद दाणेज, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, तहसीलदार महेंद्र माळी, कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, पोलिस  निरीक्षक साहेबराव कडनोर, सहायक निरीक्षक सचिन वांगडे यांनी आज आंदोलनस्थळी जगताप यांची भेट घेतली. चर्चेनंतर नागवडे व शेलार यांनी अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

विसापूरमधून पिण्याचे पाणी सोडण्यापूर्वी पथक पाहणी करून निर्णय घेईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे चर्चा फिस्कटली. आंदोलन मागे घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जलसंपदा अधिकाऱ्यांनी "कुकडी'चे आवर्तनच बंद करण्याचा इशारा दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या जगताप यांनी कालव्यातच उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला.

 

 त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. कार्यकर्त्यांनी घोषणा देत पोलिसांना विरोध केला. जगताप, नाहाटा व शेलार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना "आपण लोकशाही मार्गाने लढू' असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जगताप यांच्यासह प्रमुख 35 ते 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना बेलवंडीच्या मंगल कार्यालयात नेले. 

पत्रकारांशी बोलताना जगताप, नाहाटा व शेलार म्हणाले, ""आंदोलनास चार दिवस होऊनही सरकारला जाग येत नाही. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आम्ही माघार घेणार नाही. फळबागा जाळणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असून, हा केवळ इशारा समजू नये.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख