हर्षवर्धन पाटील यांना राजकीय संन्यास घेण्याचे आमदार भरणे यांचे आव्हान

हर्षवर्धन पाटील यांना राजकीय संन्यास घेण्याचे आमदार भरणे यांचे आव्हान

वालचंदनगर : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसतील, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, ते सदस्य असतील, तर ते राजकीय संन्यास घेणार का, असा पलटवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पाटील यांच्यावर केला.
 
हर्षवर्धन पाटील यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांनी पाण्याच्या प्रश्‍नावरून गेल्या दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. भरणे यांच्या टीकेला पाटील यांनी उत्तर देताना पाणी आणता येत नसेल, तर खुर्ची खाली करण्याचे आव्हान देऊन आपण कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसल्याचे सांगितले होते.

यानंतर भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कालवा सल्लागार समितीचे सदस्य असल्याच्या पुराव्याचे पत्र दिले आहे. पाटील हे सध्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पुण्याच्या पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी 28 सप्टेंबर रोजी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षांना लेखी पत्र पाठवून खरीप हंगामाचे पिण्याचे व सिंचनासाठीचे पाणी वापराचे नियोजनासाठी बैठकीला चार ऑक्‍टोबर रोजी उपस्थित राहण्याची विनंती केली होती. सदरच्या पत्रावर कारखान्याने पोचही दिली आहे.

यांसदर्भात भरणे यांनी सांगितले, की पाटबंधारे विभागाने कर्मयोगीच्या अध्यक्षांना बैठकीला बोलाविले म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनाच बोलाविले होते. मात्र, पाटील यांना तालुक्‍यातील जनतेचे देणे-घेणे नसून केवळ पाण्याचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करावयाची आहे. पाण्यासाठी रस्त्यावर बसण्याऐवजी बैठकीला येऊन बसले असते, तर पाण्याचा प्रश्‍न तरी समजला असता.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री होते म्हणून इंदापूर तालुक्‍याला पाणी मिळत होते. यामध्ये पाटील यांचा काडिमात्र संबंध नाही. चालू वर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये कालव्याच्या इतिहासामध्ये 113 दिवस सलग कालवा सुरू होता. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना जास्तीजास्त पाणी देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. 

सर्वसामान्यांनी दिलेली खुर्ची आहे? 

19 वर्षांच्या कालावधीला कंटाळून तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेने मला खुर्ची दिली आहे. तो काढून घेण्याचा अधिकार फक्त जनतेलाच आहे. खुर्चीच्या विषयावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. येणाऱ्या काळामध्ये ही जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही, अशा शब्दांत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com