MLA Bajoria absent from Shivsena Meet in Nashik | Sarkarnama

आमदार बाजोरियांनी शिवसेना मेळाव्याला दांडी का मारली? 

श्रीकांत पाचकवडे 
शुक्रवार, 19 मे 2017

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर सत्ताधारी मित्र पक्ष भाजपला शिंगावर घेत नाशिक येथे शिवसेनेकडून आज भव्य शेतकरी मेळावा आहे. मात्र, या मेळाव्यात वऱ्हाडातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीच दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर सत्ताधारी मित्र पक्ष भाजपला शिंगावर घेत नाशिक येथे शिवसेनेकडून आज भव्य शेतकरी मेळावा आहे. मात्र, या मेळाव्यात वऱ्हाडातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीच दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. आमदार बाजोरियांनी नाशिकच्या मेळाव्यात न जात भाजपचे नेते ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अकोल्यातील कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडून राण माजविण्यात येत आहे. शेतकऱ्यांची दैनावस्थेला सत्ताधारी भाजप सरकारचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत असल्याचा हल्लाबोल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता शेतकऱ्यांनाच बोलते करण्यासाठी नाशिक येथे राज्यस्तरीय शेतकरी मेळावा शुक्रवारी घेण्यात आला. या मेळाव्यात राज्यभरातील शेतकऱ्यांसह शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

अकोल्यात झालेल्या शिवसंपर्क अभियानात काही मोजक्‍या शेतकऱ्यांना नाशिकच्या मेळाव्यात आणण्याची जबाबदारी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर दिली होती. या मेळाव्यात जिल्हाप्रमुख नितीन देशमुख शेतकऱ्यांसह मेळाव्यात उपस्थित झाले. मात्र, आमदार बाजोरियांनी मेळाव्याला दांडी मारत अकोल्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. शिवसेनेच्या एवढ्या महत्त्वपूर्ण मेळाव्यात आमदार बाजोरियांनी मारलेली दांडी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला विषय ठरली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख