मिरा-भाईंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राजू भोईर यांची चर्चा  - Mira Bhayandar Raju Bhoir opposition leader? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मिरा-भाईंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राजू भोईर यांची चर्चा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मिरा-भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत आलेले राजू भोईर यांना दिले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत आलेले राजू भोईर यांना दिले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने एकहाती सत्ता मिळवली. राज्य आणि केंद्रात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला विरोधात बसावे लागले. त्यानंतर शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तथापि, निष्ठावंतांना डावलून नव्याने शिवसेनेत आलेले राजू भोईर यांना हे पद दिले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीत असलेल्या भोईर यांनी नंतर भाजपशी जवळीक केली आणि अखेरीस शिवसेनेत दाखल झाले. बविआत असताना त्यांना महापालिकेत अनेक पदे मिळाली होती; मात्र सभागृहात मौनच पाळले होते. त्यांना विरोधी पक्षनेतेपद का दिले जात आहे, असा प्रश्‍न काही शिवसेना कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. 

भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने विरोधी पक्षाचा किल्ला ताकदीने लढवण्यासाठी तशा क्षमतेच्या कार्यकर्त्याला हे पद देणे आवश्‍यक आहे. "मौनी सदस्य' अशी ओळख असलेले भोईर ही जबाबदारी पार पाडतील का? ते भाजपच्या गळाला लागू नयेत यासाठी शिवसेनेने केलेली ही व्यूहरचना आहे? असे प्रश्‍न विचारले जात आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख