मिरा-भाईंदरसाठी मुख्यमंत्री रणांगणात; आमदार नरेंद्र मेहतांना चाप? 

मुंबईलगतची मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांनी निवडणुकीची सारी सूत्रे ताब्यात घेतल्याने भाजपच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मुख्यमंत्रीच मैदानात उतरल्याने एका बाजूला शिवसेनेवर दबाव येईल, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना चाप बसेल, अशी चर्चा सुरू आहे.
मिरा-भाईंदरसाठी मुख्यमंत्री रणांगणात; आमदार नरेंद्र मेहतांना चाप? 

भाईंदर : मुंबईलगतची मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांनी निवडणुकीची सारी सूत्रे ताब्यात घेतल्याने भाजपच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मुख्यमंत्रीच मैदानात उतरल्याने एका बाजूला शिवसेनेवर दबाव येईल, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना चाप बसेल, अशी चर्चा सुरू आहे.
 
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी भाजपमधील इच्छुक उमेदवारांत चुरस वाढून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या "वॉर रूम'मधील पथक निवडणुकीसाठी तैनात केले असून प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीची सूत्रे हाती ठेवण्याच्या भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मनसुब्यांना थेट मुख्यमंत्र्यांनीच धक्का दिल्याचे मानले जात आहे. भाजपला थेट आव्हान देणाऱ्या शिवसेनेलाही लगाम बसेल, असे संकेत मिळत आहेत.
 
महापालिकेत शिवसेना, भाजप आणि बविआ यांची सत्ता आहे. त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपमधील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असून अनेक नगरसेवकांची तिकिटे कापली जाण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जाते. अनेकांना दिलेल्या उमेदवारीच्या आश्‍वासनांची पूर्तता होणे कठीण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये बंडाळीची चिन्हे दिसत आहेत. मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देण्याचे धोरण आमदार नरेंद्र मेहता यांनी घेतल्यामुळे हाती येणारी सत्ता निसटून जाईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळेच खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीची सूत्रे हातात घेतल्याचे सांगण्यात येते. 

या घडामोडींमुळे स्थानिक नेतृत्वाकडून मर्जीतील व्यक्तींना उमेदवारी देण्याचा घाट बारगळणार आहे. परिणामी आमदार मेहता आणि त्यांच्या समर्थकांना फटका बसेल, असे बोलले जात आहे. परंतु, राजकीय डावपेचांत तसेच वरिष्ठांचे मन वळवण्यात तरबेज मानले जाणारे आमदार मेहता तिकीट वाटपावरील पकड सहजपणे सोडणार नाहीत, असे जाणकारांना वाटते. त्यातच मेहता यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उमेदवारांची नावे जवळपास निश्‍चित झाली आहेत. 'प्रचाराला लागा', असे संकेत त्यांनी अनेकांना दिले आहेत. महापालिकेत एकहाती सत्ता आणायची असल्यास आमदार मेहता सांगतील त्याच उमेदवारांना हिरवा कंदील दाखवणे वरिष्ठांना भाग पडेल, अशीही शक्‍यता वर्तवली जात आहे. 

मुलाखतींचा सोपस्कारच? 
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून पक्षाचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्या अर्जांची छाननी करून 21 आणि 22 जुलैला पक्षाचे प्रभारी खासदार कपिल पाटील आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक "कोअर कमिटी' इच्छुकांच्या मुलाखती घेतील. त्यानंतर अहवाल तयार करून प्रदेश समितीला पाठवला जाईल. हा केवळ सोपस्कार असून उमेदवारी कोणाला द्यायची, हे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने जवळपास निश्‍चित केले आहे. 

इच्छुकांना थोपवण्याची रणनीती 
काही प्रभागांत विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पेच निर्माण झाल्याचे समजते. बंडाळीची शक्‍यता असल्याने उमेदवार जाहीर न करता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांना थोपवून धरण्याची रणनीती आखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली असून अनेकांनी व्यक्तिगत प्रचारही सुरू केला आहे. काही प्रभागांत मात्र उमेदवारीवरून वाद नसल्याने एकत्रितपणे प्रचार सुरू झाल्याचे दिसते. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने केलेल्या प्रभागनिहाय सर्वेक्षणानुसार सहा जागांवर विजय मिळण्याचा अंदाज असला, तरी सात जागा आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com