मिरा-भाईंदर महापालिका विरोधी पक्षनेत्याचा विषय पेटला; शिवसेना-भाजप समोरासमोर 

मिरा-भाईंदर महापालिकेत सध्या वर्चस्वाची लढाई सुरू असून पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपने शिवसेनेला डिवचण्यास आरंभ केला आहे. विरोधी पक्षनेतेपद रोखून धरल्यामुळे शिवसेना भाजपसमोर उभी ठाकली आहे.
मिरा-भाईंदर महापालिका विरोधी पक्षनेत्याचा विषय पेटला; शिवसेना-भाजप समोरासमोर 

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत सध्या वर्चस्वाची लढाई सुरू असून पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपने शिवसेनेला डिवचण्यास आरंभ केला आहे. विरोधी पक्षनेतेपद रोखून धरल्यामुळे शिवसेना भाजपसमोर उभी ठाकली आहे. 

मिरा-भाईंदर महापालिकेच्या 8 नोव्हेंबरला झालेल्या महासभेत महापौर डिंपल मेहता यांनी विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करणे टाळले. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी व्यासपीठावर येऊन महापौरांशी बाचाबाची केली. त्याबद्दल महापौर डिंपल मेहता यांनी पाटील यांना नुकतेच समजपत्र पाठवले. त्याला पाटील यांनी सोमवारी (ता. 13) पाठवलेल्या पत्रात शिवसेना "शैली'चा वापर केल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपणार असल्याचे बोलले जात आहे. 

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे; तर विरोधी बाकांवरील शिवसेना आणि कॉंग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वांत मोठा विरोधी पक्ष असल्याने नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेलाच मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिवसेनेचे गटनेते हरिश्‍चंद्र आमगावकर यांनी 16 ऑक्‍टोबरला झालेल्या विशेष महासभेत राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली होती. महापौर त्याच वेळी भोईर यांच्या नावाची घोषणा करतील, अशी शिवसेनेची अपेक्षा होती; परंतु तसे झाले नाही. 

त्यानंतर 8 नोव्हेंबरला झालेल्या महासभेतही महापौरांनी या पदावरील नियुक्तीबाबत घोषणा केलीच नाही. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी संतप्त होऊन सभागृहात गोंधळ घातला. पाटील यांच्यासह इतर सदस्य व्यासपीठावर चढले. काही जणांनी महापौर आणि उपमहापौर चंद्रकांत वैती यांचे माईक खेचले. नगरसचिवांचा माईक तोडून टाकण्यात आला. पाटील यांनी महापौरांशी बाचाबाची केली. 

त्या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन सांस्कृतिक भवन साकारण्यासह एकूण 18 ठराव संमत केले. महासभा अवघ्या दोन तासांतच आटोपण्यात आली. त्याचे चित्रीकरण "व्हायरल' होऊन महापालिका सभागृहातील गोंधळाचे वाभाडे निघाले. 

अखेर महापौरांनी पाटील यांना 9 नोव्हेंबरला समजपत्र दिले. महिला महापौराशी बोलताना गोंधळ घालून केलेले गैरवर्तन खेदजनक आहे. यापुढे असे प्रकार केल्यास कायदेशीर कारवाई करू, अशी समज महापौरांनी त्यांना दिली आहे. 

त्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी महापौर मराठी भाषेचा तिरस्कार करत असल्याचा आरोप केला आहे. त्या सभागृहात आगरी-कोळी भूमिपुत्रांसह ज्येष्ठ सदस्यांचा सभागृहात अपमान करतात, असाही आरोप केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयावर विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला सूचना करायच्या होत्या. परंतु, तो प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी घाईघाईने मंजूर केला. त्यावरून भाजपला ठाकरे यांचे कलादालन होऊच द्यायचे नाही, असा आरोप पाटील यांनी भाजपचे आमदार नरेंद्र महेता यांचे नाव न घेता केला. 

"विनाशाकडे वाटचाल' 
भाजपला झालेला सत्तेचा अहंकार पुढे विनाशाकडे घेऊन जाईल. महापालिकेला आपली खासगी मालमत्ता समजू नये, असा इशारा प्रवीण पाटील यांनी लगावला आहे. शिवसेनेला लढाई नवीन नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करून प्रशासनाला दोन्ही कलादालने उभारण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा शिवसेना विरोधी पक्षनेत्यांच्या दालनातूनच कामकाज सुरू करील, असे त्यांनी ठणकावले आहे. 

गोंधळ सुरूच राहणार? 
सत्ताधाऱ्यांना दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन तळमजल्यावर स्थलांतरित करायचे आहे. विरोधी पक्षनेत्यांची घोषणा झाल्यास शिवसेना दुसऱ्या मजल्यावरील दालनाचा ताबा सोडणार नाही, अशी भीती वाटत असल्यानेच भाजपकडून टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपने विरोधी पक्षांबाबत असेच धोरण ठेवल्यास महापालिकेच्या प्रत्येक सभेत गोंधळ होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. 

पक्षपाताचा आरोप 
मिरा-भाईंदर महापालिकेच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना महापौर पाठीशी घालत असून विरोधकांना मात्र वेगळा न्याय देत आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे अनिल सावंत यांनी केला. यापूर्वीच्या महासभेत सत्ताधारी भाजपचे ध्रुवकिशोर पाटील व्यासपीठावर जाऊन महापौर आणि उपमहापौरांना सल्ला देत होते. ते वर्तन नियमांच्या विरोधात असूनही महापौरांनी कोणतीही कारवाई केली नव्हती, असे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com