mira bhaindar | Sarkarnama

मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप यांच्यात सत्तासंघर्षांची शक्‍यता

महेश पांचाळ
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील सत्तासंघर्षामुळे मुंबईच्या पश्‍चिमेला असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेतील विद्यमान कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना आतापासून वेग आला आहे. 

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील सत्तासंघर्षामुळे मुंबईच्या पश्‍चिमेला असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेतील विद्यमान कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना आतापासून वेग आला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेत सध्या भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. भाजपच्या गीता जैन महापौर तर शिवसेनेचे प्रवीण पाटील उपमहापौर आहेत. 95 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे 29, शिवसेनेचे 14, राष्ट्रवादीचे 27, कॉंग्रेसचे 19, मनसेचा एक, अपक्ष आणि अन्य 4 असे नगरसेवक निवडून आले होते. मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीचे हुकमी नेते माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा गेली अनेक वर्षे दबदबा होता. घोडबंदर रोड येथील 875 कोटी रुपयांच्या जमीन बळकावल्याप्रकरणी 2016 मध्ये 27 जूनला मेंडोन्सा यांना अटक झाली. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. मेंडोन्सा यांच्या अनुपस्थितीत माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे पक्षाची जबाबदारी असली तरी, गटातटाच्या पक्षीय राजकारणामुळे राष्ट्रवादी पोखरली असल्याचे बोलले जाते. त्यात, मेंडोन्सा ही शिवसेनेत जाणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

मेंडोन्सा यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्यामुळे सेनेत त्यांना प्रवेश दिला जाण्याची शक्‍यता या क्षणाला कमी वाटत आहे. मात्र महापालिकेतील प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील आणखी काही नगरसेवक सेनेत जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 
सध्या भाजपसोबत महापालिकेत युती असली तरी, आगामी महापालिका निवडणूक लढविताना पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवक दिनेश नलावडे, राजू वेतोस्कर , राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनिता पाटील, वंदना पाटील, मनसेचे एकमेव नगरसेवक अरविंद ठाकूर आदी पाच विद्यमान नगरसेवकांनी एकाच वेळी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या पाच नगरसेवकांनी मातोश्रीवर भेट घेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी प्रवेश घेतला आहे.आणखी काही नगरसेवकांना सेनेत आणण्याच्या दृष्टीने आमदार सरनाईक यांच्याकडून चाचपणी सुरू आहे. 
सेनेकडून अन्य पक्षांच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचण्यात येत असले तरी, आम्हाला त्याची काहीही चिंता नाही. मीरा भाईंदर शहरात भाजपची ताकद आहे. पुढचा महापौरही भाजपचा असेल, असा दावा स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख