Ministers not sitting in their office | Sarkarnama

मंत्र्यांचे मन मंत्रालयात रमेना, कॅबिनेट होताच पुन्हा गावाकडे 

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मंगळवारी झालेल्या कॅबिनेटला सर्व मंत्री झपाटून आले असले तरी संध्याकाळी त्यातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी मुंबईतून आपल्या गावाकडे धूम ठोकली यामुळे दिवसभरात मंत्रालयात अनेक मंत्र्यांच्या दालनासमोर शुकशुकाट पहावयास मिळाला.

 

मुंबई:शिवसेनेसह भाजपाच्या मंत्र्यांचे मन मंत्रालयातील कामकाजात रमत नसल्याने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर अनेक मंत्र्यांनी आपल्या गावाकडे धाव घेतली आहे. मंत्रालयात बुधवारी काही मंत्र्यांचा अपवाद सोडला तर कॅबिनेटसह अनेक राज्यमंत्र्यांच्या दालनासमोर शुकशुकाटाचे वातावरण पसरले होते.

 अनेकांच्या दालनासमोरील खुर्च्याही रिकाम्या पडल्या होत्या. तर दुसरीकडे ग्रामीण भागातून आपल्या कामासाठी आलेल्या असंख्य नागरिकांकडून मंत्रीच हजर नसल्याने आपले काम होत नसल्याने पुन्हा हेलपाटे वाढणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मंत्रालयात उमटल्या आहेत. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर मंत्रालयात अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयात किमान दोन-तीन दिवस तरी थांबण्याऐवजी थेट आपल्या मतदारसंघाची वाट धरली असल्याने मंत्रालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटला सर्व मंत्री झपाटून आले असले तरी संध्याकाळी त्यातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी मुंबईतून आपल्या गावाकडे धूम ठोकली यामुळे दिवसभरात मंत्रालयात अनेक मंत्र्यांच्या दालनासमोर शुकशुकाट पहावयास मिळाला.

कॅबिनेटनंतर मंत्रालयात हजर नसलेल्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन,आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटमंत्री रामदास कदम, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्य मंत्री दिपक सावंत, रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मंत्र्यांचा समावेश आहे. 

त्यासोबतच राज्यमंत्र्यांमध्ये पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत,वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी मंत्र्यांचेही मन मंत्रालयात रमत नसल्याने त्यांनी आपापल्या मतदारसंघाकडे धाव घेतल्याचे समोर आले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उच्च शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आदी मंत्र्यांनी मात्र बुधवारी संपूर्ण दिवस मंत्रालयात घालवला

. यात कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अर्ध्याच दिवसाची हजेरी लावली तर राज्यभरातून आलेल्या नागरिकांचा खोळंबा होउ याची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट मात्र आपल्या दालनासमोर मोठा बोर्ड लावून आपण पुण्याच्या दौर्यावर असल्याचे लिहून ठेवले होते. बापट यांच्या दालनासमोरील संदेशासोबत त्यांच्या अधिकार्यांनाही आपण कधी येणार आहोत, याची माहिती द्यावी अशा सूचनाही आपल्या अधिकार्यांना दिल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख