गेले मंत्री कुणीकडे? - Ministers bunk cabinet meeting  | Politics Marathi News - Sarkarnama

गेले मंत्री कुणीकडे?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मे 2017

अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार, आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्यासह दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री पांडुरंग फुडकर आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे चौघेजण मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर होते.

मुंबई : दर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्र्यांची हजेरी असते म्हणून मंत्रालयात आलेल्या अनेक नागरिकांना काही मंत्र्यांना भेटता आले नसल्याने निराशा झाली. 

अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार, आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्यासह दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री पांडुरंग फुडकर आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे चौघेजण मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर होते. त्यामुळे, गेले मंत्री कुणीकडे अशी विचारणा नागरिकांकडून केली गेली.

जीएसटी कायदा लागू करण्यासंदर्भात 20 ते 22 मे 2017 रोजी मुंबईत विशेष अधिवेशन आहे. मंत्रिमंडळात यासंदर्भात काही निर्णय असू शकतात, हे गृहीत धरुन अनेक नागरिकांनी पाचव्या मजल्यावरील अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या कार्यालयात चकरा मारल्या. परंतु, कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकले नाही असे सांगण्यात आले. 

सुधीर मुनंगटीवार हे जम्मू येथील केंद्रीय अर्थमंत्रालयाने आयोजित केलेल्या जीएसटी विधेयकासंदर्भातील विशेष बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी निघणार आहेत. 18 मे ते 19 मे अशी जम्मू येथे ही बैठक होणार आहे.त्यामुळे अर्थमंत्र्यांना भेटून कामे मार्गी लावणाऱ्यांना विशेष अधिवेशन संपेपर्यंत थांबावे लागणार आहे.

 शिवसेनेचे आरोग्य मंत्री दिपक सावंत हे शिवसेनेच्या दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. परळीतील निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने पुन्हा चर्चेत असलेल्या ग्रामविकास मंत्री मुंडे या अमेरिकेच्या   दौऱ्यावर आहेत. 

तसेच ऑस्ट्रेलिया विधीमंडळाचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या विधीमंडळाच्या लोकप्रतिनिधींच्या टिममध्ये असलेले कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर हे आज रात्री परतणार असल्याचे समजते. त्यामुळे चार कॅबिनेट मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे मंत्रिमंडळ पार पडली असली तरी, कोण मंत्री कुठे गेले अशी चर्चा मंत्रालयात रंगली होती. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या दालनाबाहेर आज अनेक नागरिकांची गर्दी होती. परंतु, पक्षांच्या कार्यक्रमानिमित्त ते सांयकाळी 4 वाजता इंदोर येथे जाण्यास निघाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख