Ministers are not sitting in their office | Sarkarnama

मंत्रालयात मंत्र्यांचाच दुष्काळ

संजीव भागवत: सरकारनामा न्यूज ब्युरो 
सोमवार, 17 एप्रिल 2017

मंत्रालयात किमान आठवड्यातून दोन दिवस तरी मंत्र्यांनी रहावे अशी ताकिद यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती, मात्र त्याकडे भाजपासह शिवसेच्याही मंत्र्यांना विसर पडला असल्यानेच असा सर्व प्रकार समोर असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहेत.

मुंबई:विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेकांनी मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.
 मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र मंत्रालयात निर्माण झाले आहे.आपल्या कामासाठी आलेल्या असंख्य नागरिकांना मंत्रालयात अनेकदा खेटे मारूनही मंत्री भेटत नाहीत, अशा स्थितीत मंत्रालयात मंत्र्यांचा दुष्काळ पडला की, काय असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 
मंत्रालयात किमान आठवड्यातून दोन दिवस तरी मंत्र्यांनी रहावे अशी ताकिद यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती, मात्र त्याकडे भाजपासह शिवसेच्याही मंत्र्यांना विसर पडला असल्यानेच असा सर्व प्रकार समोर असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यापासून भाजपा-सेनेच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी केवळ एखाद्या दिवशी मंत्रालयात वेळ घातला असून उर्वरित दिवस ते आपापल्या मतदार संघात रमले आहेत. 
यात केवळ सेना-भाजपाचेच नाही तर रासपचे महादेव जानकर, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचाही यात समावेश आहे. यादरम्यान, आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस मंत्रालयात घालणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आदींचा समावेश आहे. तर मंत्रिमंडळात मोठे स्थान असलेल्यापैकी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मंत्रालयात एक-दोन दिवसापेक्षा अधिक पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
त्यातच राज्यातील लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका 19 एप्रिल रोजी होत असल्याने या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपा-सेनेचे अनेक मंत्री गुंतल्याने मंत्रालयात मंत्र्यांचा दुष्काळ पडला असल्याचे बोलले जात आहे. 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेची येत्या 19 मार्च रोजी निवडणुका असल्याने मुनगंटीवर यांनी या निवडणुकीसाठी चंद्रपुरातच तळ ठोकला आहे. तर जिल्हा परिषदाच्या निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यात चांगले यश आल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक मंत्री लातूर आणि परभणी महापालिका निवडणुकीत गुंतले आहेत.
 तर दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी दिवाकर रावते, राज्यमंत्री अर्जून खोतकर, राज्यमंत्री संजय राठोड आदीही लातूर, परभणीच्या दौऱ्यावर आणि त्यासोबत आपल्या मतदार संघातच राहत असल्याने मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रश्‍न अर्धवट पडून असल्याचेही मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडूनही बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख