minister vishvajeet kadam | Sarkarnama

'सरस' वारस मंत्री झाला!

अजित झळके 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पतंगराव कदम यांनी प्रत्येक तालुक्‍यातील नेत्यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. तीच भूमिका विश्‍वजीत यांना वठवावी लागेल. राज्यमंत्रीपदाच्या निमित्ताने त्यांच्या हाती ताकद आली आहे. ती कॉंग्रेस उद्धारासाठी ते वापरतील, अशी जिल्ह्यातील कॉंग्रेसजणांना अपेक्षा आहे.

सांगली : कॉंग्रेसचे युवा नेते आमदार विश्‍वजीत कदम यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते केवळ डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र, त्यांचे वारस म्हणून या स्थानावर पोहचले नाहीत तर त्यांनी गेल्या दशकभरात राजकीय पटलावर आपण केवळ वारस नाही तर 'सरस' आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता त्यांना राज्याच्या राजकारणातील वजन आणखी वाढले आहे. 

सांगली जिल्ह्यात कॉंग्रेसला उभारी देण्यात विश्‍वजीत यांच्या मंत्रीपदाचा नक्कीच उपयोग होणार आहे. येथे कॉंग्रेसमध्ये मोठी राजकीय पोकळी आहे, ती व्यापण्याची संधी त्यांना मिळाली आहे.  पतंगराव कदम यांच्या निर्णयाचा धडाका, कामाचा जबरदस्त आवाका, राज्यव्यापी नेतृत्व, गतीमान कामाची पद्धत, भारती विद्यापीठाचा विस्तार आणि दर्जात्मक वाढीसाठीचे नियोजन या साऱ्याचा वारसा विश्‍वजीत यांना लाभला आहे. त्यांनी वडिलांची कारकिर्द जवळून पाहिली आहे. त्या विचारांचाच वारसा त्यांनी पुढे चालवावा, अशी लोकभावना आहे. त्या भावनेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न विश्‍वजीत यांनी केल्याचा विश्‍वास त्यांचे समर्थक व्यक्त करतात. 

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काढलेली राज्यव्यापी पदयात्रा लक्षवेधी ठरली. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या धोरणांविरोधातही ते रस्त्यावर उतरले. कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या काळात पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी केलेल्या कामाने विरोधक वाहून गेले. पलूस-कडेगावसह जिल्ह्यातील लोकांच्या मनात विश्‍वजीत यांची एक वेगळी प्रतिमा या महापुराने ठसली गेली. गेल्या विधानसभेला त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार नव्हता, मात्र त्यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्‍य घेतले. घराघरात पोहचले. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी जत विधानसभा मतदार संघातही भाजपचा पराभव करत कॉंग्रेसचा झेंडा रोवला. 
जिल्ह्यात कॉंग्रेसची अवस्था फारशी चांगली नाही. जत, पलूस-कडेगाव मतदार संघात कदम यांचाच प्रभाव आहे. आता अन्यत्र त्यांना ताकदीने लक्ष घालण्याची संधी आहे. 

वसंतदादा घराण्याशी जुळवून घेत, नव्या पिढीच्या नव्या शिलेदारांना बळ देत ते जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट करतील, अशी अपेक्षा कॉंग्रेसजणांना आहे. सांगली मतदार संघात कॉंग्रेसचा निसटता पराभव झाला होता. येथे संधी मोठी आहे. मिरजेत कॉंग्रेसचा गड आहे, तो एकजूट बांधणे बाकी आहे. खानापूर मतदार संघात कॉंग्रेसला नेता नाही, शिराळ्यात गट राहिला नाही... अशा स्थितीत त्यांना लक्ष द्यावे लागेल. पतंगराव कदम यांनी प्रत्येक तालुक्‍यातील नेत्यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. तीच भूमिका विश्‍वजीत यांना वठवावी लागेल. राज्यमंत्रीपदाच्या निमित्ताने त्यांच्या हाती ताकद आली आहे. ती कॉंग्रेस उद्धारासाठी ते वापरतील, अशी जिल्ह्यातील कॉंग्रेसजणांना अपेक्षा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख