पत्नीला पराभूत केल्याने आदिवासी विकासमंत्री पडवी शिवसेनेवर नाराज

नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात नेत्यांचे पक्षांतराचा कोणताही परिणाम झालेला नाही. तर राजकीय पक्षांचे व नेत्यांचे वर्चस्व जिल्ह्याच्या राजकारणावर जैसेथे असल्याचे पुन्हा एकदा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालातून सिद्ध झाले आहे. मागील निवडणुकीचा विचार केल्यास नेते तेच पक्ष मात्र बदलले आहेत. त्यामुळे त्याचा आताच्या निवडणुकीवर फारसा फरक दिसत नाही. मात्र नेते ज्या पक्षात गेले त्या पक्षाचे नाव मोठे झाले आहे.
minister k. c. padwi wife looses election
minister k. c. padwi wife looses election

नंदुरबार : येथील जिल्हा परिषदेत केवळ एक सदस्य असणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावित आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत वाणी, सातपुडाचे अध्यक्ष दीपक पाटील, जयपाल रावल आदींच्या समन्वयातून आज २३ सदस्य मिळाले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांपासून कोसोदूर असलेल्या शिवसेनेलाही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून अपेक्षेएवढी नसली तरी जोरदार एंट्री मिळाली आहे. कॉंग्रेसनेही आदवासी विकासमंत्री  के. सी. पाडवी, ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक, अभिजित पाटील आदींच्या प्रयत्नातून २३ जागा मिळाल्या आहेत.

डॉ. गावित भाजपमध्ये आल्याने गेल्यावेळेस २५ जागा असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत तीनच जागा मिळाल्या आहेत. तर २९ सदस्य असलेल्या काँग्रेसला श्री. रघुवंशी यांच्या पक्षांतरामुळे २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत डॉ. गावित व रघुवंशी यांच्या पक्षांतरामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोणताही फरक दिसून येत नाही.

भाजपचे वर्चस्व वाढले
जिल्हा परिषदेत कधीकाळी एन्ट्रीही नसलेल्या भाजपला डॉ. विजयकुमार गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे बळ मिळाले आहे. डॉ. गावित जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढाईत २५ जागा जिंकल्या होत्या. तेच आता भाजपमध्ये प्रवेशानंतरचे चित्र आहे. त्यावेळेस राष्ट्रवादीला बळ मिळाले होते. आता डॉ. गावित भाजपमध्ये आल्यावर भाजपला बळ मिळाले आहे. केंद्र व राज्यातील भाजपचा सरकारचा परिणाम कोणत्याही प्रकारे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला नाही. या निवडणूका जिल्ह्यातील नेत्यांच्या वर्चस्वावरच जिंकता येतात हे पुन्हा सिध्द झाले आहे.

शिवसेनेची ताकद वाढली
चार महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसमधील बहुतांश कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे काँग्रेस दिशाहिन झाली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मागीलवेळी काँग्रेसची सत्ता होती. श्री. रघुवंशी यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसची जागा शिवसेना घेईल व जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्तापित होईल असे चित्र सर्वत्र निर्माण झाले होते. त्यादृष्टीने श्री. रघुवंशी यांनीही नियोजन केले होते. मात्र निवडणुकीचा निकाल वेगळाच समोर आला आहे. काँग्रेसमध्ये असताना मिळालेल्या २९ जागा श्री. रघुवंशींमुळे शिवसेना मिळतील असे वाटत असतांना शिवसेनेला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच श्री. रघुवंशी यांनी काँग्रेस सोडल्याचा कोणताही परिणाम मतदारांवर झालेला नाही. विशेषत: धडगाव, शहादा तालुक्यात काँग्रेसच्या जागा जास्त आल्या आहेत. मात्र शिवसेनेत आमदार रघुवंशी आल्यामुळे निवडणुकांपासून कोसोदूर असलेल्या शिवसेनेची ताकद वाढून सात जागांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत शिवसेनेला एन्ट्री मिळाली आहे.


सत्तेसाठी शिवसेनाच निर्णायक
भाजपने २३ व काँग्रेसलाही २३ जागा मिळाल्याने दोघांपैकी ज्यांनाही जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करायची असेल त्यांना शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे तेवढेच खरे आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ जागा असून बहुमतासाठी २९ सदस्य आवश्‍यक आहेत. दोन्ही पक्षांना सहा सदस्यांची गरज भासणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी भाजपशी हात मिळवणी केल्याने राष्ट्रवादीचे तिन्ही सदस्य भाजपप्रणित आहेत. त्यामुळे भाजपचे २३ व राष्ट्रवादीचे तीन मिळून २६ संख्या होते. २९ चा आकडा गाठण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला पुन्हा तीन सदस्य आवश्‍यक आहेत. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी सहा सदस्यांची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे.

रघुवंशी - पाडवींमध्ये मतभेद
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधी म्हणजेच अक्राणी गटात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या विरोधात प्रचार करुन त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केल्याने श्री. पाडवी यांना अल्पमताने निवडणूक जिंकता आली. तो रोष श्री. रघुवंशी यांच्यावर असल्यामुळे महाविकास आघाडीच्या फार्मुल्याला के. सी. पाडवी यांनी सर्वप्रथम विरोध दर्शवित स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाआघाडी झाली नाही. त्यासोबतच तोरणमाळ गटात मंत्री पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांच्या विरोधात शिवसेनेने गणेश पराडके यांना उमेदवारी देऊन सौ. पाडवी यांना पराभूत केले. मंत्री व काँग्रेसचे नेते या नात्याने तो पराभव श्री. पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे.

भाजपलाच गरज शिवसेनेची
राजकीय वर्तुळात के. सी. पाडवी व श्री. रघुवंशी एकत्र येणार नसल्याचे चित्र रंगवले जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी मैत्रीपूर्ण सलोखा वाढवला आहे. त्या दोघांमध्ये अंतर्गत सहमती झाल्याचीही चर्चा आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावरुन बेबनाव वाढला असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे आता भाजपलाच शिवसेनेची म्हणजेच पर्यायाने माजी आमदार रघुवंशी यांची सत्ता स्थापनेसाठी गरज आहे. त्यामुळे डॉ. गावित श्री. रघुवंशी यांच्याशी पुन्हा नव्याने वेल्डिंग करतील व ॲड. राम रघुवंशी यांना उपाध्यक्षपद बहाल करुन जिल्हा परिषदेत भाजपचा झेडा फडकविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com