Minister Lonikar is invoved in sandfly theft : Suresh Jethliya | Sarkarnama

परतुर तालुक्‍यातला मुरूम पालकमंत्री  बबनराव लोणीकर चोरतात : सुरेश जेथलिया

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

माझ्या व कुटुंबाच्या विरोधात ते सुडाचे राजकारण करत असून आमची विनाकारण  बदनामी करत असल्याचे सांगतांना जेथलिया यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळले.

परतुरः शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे दर्जाहिन आहेत, भूमिगत गटार योजनेच्या रस्त्यांमुळे उद्या लोकांच्या घरात पाणी घुसणार आहे अशा दर्जाहीन कामाबद्दल बोललो तर उलट पालकमंत्र्यांकडून माझी व कुटुंबाचीच बदनामी केली जाते .  उलट तालुक्‍यातील मुरूमाची चोरी इतर कुणी नाही तर पालकमंत्री बबनराव लोणीकरच करतात ," असा  खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी पत्रकार परिषदेत केला.  

गेल्या अनेक महिन्यापासून पालकमंत्री बबनराव लोणीकर व कॉंग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. लोणीकरांकडून नगरपरिषदेतील भ्रष्टाचार तर जेथलियांकडून तालुक्‍यात सुरू असलेल्या विविध शासकीय कामांचा दर्जा व त्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

या संदर्भात आज (ता. 10) सुरेश जेथलिया यांनी आपल्या परतुर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संतापाला वाट मोकळी करून दिली. जेथलिया म्हणाले, " पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माझी व कुटुंबाची विनाकारण बदनामी चालवली आहे. पण नगरपरिषदेच्या कारभारात एका रुपयाचा भ्रष्टाचारा झाल्याचे त्यांनी सिध्द करून दाखवावे. तसे झाले तर मी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतो, आगामी विधानसभा निवडणूक न लढवता राजकीय सन्यांस घेतो'',असे खुले आव्हान जेथलिया यांनी बबनराव लोणीकारांना दिले. 

" पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहरात सुरु असलेल्या मुख्य सिमेंटचा रस्ता अत्यंत निकृष्ट आहे. शिवाय भुमिगत गटार योजनेच्या माध्यामातून करण्यात येणाऱ्या चुकीच्या रस्त्यांमुळे उद्या लोकांच्या घरात पाणी घुसणार आहे मग त्याला लोणीकर जबाबदार नाहीत का? कामाच्या दर्जा सुधारा असेही आम्ही बोलायचे नाही का? लोणीकरांकडून दर महिन्याला दिंडी मार्गाचे उदघाटन  केले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते दादागिरीची भाषा वापरतात. मग आम्ही बोलायचे नाही का ?" असा प्रश्न जेथलिया यांनी उपस्थित केला . 

माझ्या व कुटुंबाच्या विरोधात ते सुडाचे राजकारण करत असून आमची विनाकारण  बदनामी करत असल्याचे सांगतांना जेथलिया यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळले. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष रहेमुदिन कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष अखिल काजी, माजी नगर अध्यक्ष अविनाश शहाणे, गटनेते बाबुराव हिवाळे आदींची उपस्थिती होती. 

जेथलिया यांनी केलेल्या आरोपांना आता पालकमंत्री बबनराव लोणीकर काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख