minister gulabrao patil warns about essential commodity act | Sarkarnama

साठेबाजी करून पैसे कमाविण्याची ही वेळ नाही : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

जिल्ह्यात सर्वत्र प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये चोवीस तास उघडी ठेवण्यात आली आहेत. त्यात जाऊन उपचार करा.

जळगाव : राज्यात, देशात कोरोनोचे संकट आहे. शासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. या दरम्यान कोणी जीवनावश्‍यक वस्तुंची साठेबाजी, काळाबाजार करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

'कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले कि, किराणा माल घेण्यासाठी सर्वत्र गर्दी होते. जिल्ह्यात किराणा माल भरपूर आहे. आताच संपणार नाही. उगाच गर्दी करू नये. 'लॉकडाऊन'चा फायदा घेवून जर कोणी जीवनावश्‍यक वस्तुंचा साठा करून काळाबाजार करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सद्यस्थितीत जनतेवर आलेल्या अडचणीचा फायदा घेवून पैसे कमाविण्याची ही वेळ नाही, त्यामुळे कोणीही जीवनावश्‍यक वस्तुंची साठेबाजी करू नये असे अवाहनही त्यानीं केले.

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले, की ग्रामीण भागात कोणी बाहेर गावाहून आला तर त्याला गावात येऊ देत नाही किंवा कोणाला ताप, थंडी वाजली तर जिल्हा रुग्णालयातच येण्याचा आग्रह धरला जातो. नागरिकांनी असे करू नये. जिल्ह्यात सर्वत्र प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये चोवीस तास उघडी ठेवण्यात आली आहेत. त्यात जाऊन उपचार करा. तेथील डॉक्‍टर ठरवतील रुग्णाला जळगाव पाठवायचे किंवा नाही. त्यासाठी तेच गाडी करून देतील. सर्व रुग्णालयात औषधसाठा भरपूर आहे, प्रशिक्षित स्टाफही आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले, की सुदैवाने एकही संशयित रुग्णाला कोरोनो झालेला आढळून आलेला नाही. जे आले होते ते संशयित होते. त्यावर उपचार करून ज्यांना डिस्चार्ज दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख