Minister Deshmukh Had to pay road toll | Sarkarnama

लाल दिवा गेल्याचा अजब फटका, सहकार मंत्र्यांना भरावा लागला टोल

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

मंत्री देशमुख यांची गाडी असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकाने टोल नाक्यावरील कर्मचा-याला सांगितले. पण गाडीवर लाल दिवा नसल्याने त्या कर्मचा-याने विश्वास ठेवला नाही. आपली ओळख पटवून देण्यात स्वत: देशमुख यांना रस नव्हता. त्यामुळे त्यांनी तात्काळ टोलची रक्कम भरून पुढच्या प्रवासाला निघाले.

मुंबई, ता. २९ : लाल दिवा गेल्यामुळे आता मंत्र्यांच्या वाहनांचे महत्व सुद्धा सामान्य जनतेसारखेच राहिले आहे. याचे प्रत्यंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना नुकतेच आले. 

पुण्यावरून मुंबईला येत असताना खालापूर टोल नाक्यावर देशमुख यांच्या गाडीला अडविण्यात आले. मंत्री देशमुख यांची गाडी असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकाने टोल नाक्यावरील कर्मचा-याला सांगितले. पण गाडीवर लाल दिवा नसल्याने त्या कर्मचा-याने विश्वास ठेवला नाही. आपली ओळख पटवून देण्यात स्वत: देशमुख यांना रस नव्हता. त्यामुळे त्यांनी तात्काळ टोलची रक्कम भरून पुढच्या प्रवासाला निघाले.

विशेष म्हणजे, देशमुख यांच्या ताफ्यात असलेल्या अन्य वाहनांतील अधिका-यांनी मात्र आपली 'ओळख पटवून' दिल्याने त्यांना टोल भरावा लागला नाही.

पिंपरीमधील भाजप कार्यकारिणीची बैठक संपवून गुरूवारी परत येत असताना देशमुख यांना हा अनुभव आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वास्तविक, मंत्री, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, पोलीस यांना टोल सवलत लागू आहे. त्यामुळे वाहनावर लाल किंवा अंबर दिवा, महाराष्ट्र शासन, पोलीस असे लिहिलेले असेल तर त्या वाहनांना अडविण्याच्या फंदात टोल कर्मचारी पडत नाहीत.

मंत्र्यांची गाडी ओळखण्याची आणखी एक महत्वाची खूण आहे. समोर काचेवर लाल रंगाने इंग्रजी अक्षरात 'एम' असे लिहिलेले असेल तर ती मंत्र्यांची गाडी असते. पण याविषयी जनमाणसांत व सरकारी कर्मचा-यांमध्येही फार जागृती नाही. लाल दिव्याऐवजी आता 'एम' या अक्षराची लोकांमध्ये ओळख होईपर्यंत मंत्र्यांना अशा छोट्या मोठ्या समस्या सहन कराव्याच लागतील असे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख