नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या निमित्ताने "एमआयएम'चे शुक्रवारी जोरदार शक्तीप्रदर्शन

 नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या निमित्ताने "एमआयएम'चे शुक्रवारी जोरदार शक्तीप्रदर्शन

औरंगाबाद : नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीसीए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या (एनआरसी) विरोधात देशभरात आगडोंब उसळला आहे. विविध राज्यात या कायद्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. विशेषत एमआयएमने सीसीए व एनसीआरला कडाडून विरोध दर्शवला आहे. संसदेत विरोधात मतदान केल्यानंतर आता महाराष्ट्रात एमआयएम मोर्चाच्या माध्यमातून आपली शक्ती दाखवणार आहे. 20 डिसेंबर रोजी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले आणि पक्षाने मोठा जल्लोष साजरा केला. पण त्यानंतर सहा महिन्यांनीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला औरंगाबादेत पराभवाचे तोंड पहावे लागले. मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले इम्तियाज जलील यांना आपला मतदारसंघ देखील राखता आला नाही. त्यामुळे लोकसभेत झालेला एमआयएमचा विजय हा एक अपघात होता या चर्चेवर विधानसभेतील निकालाने शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते. 

शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यापासून एमआयएम पक्षात काहीसी मरगळ आल्याचे चित्र होते. पंरतु केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजुर केल्यानंतर आता त्या विरोधात सर्वच विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. एमआयएमने देखील या निमित्ताने औरंगाबाद आणि मराठवाड्यात शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा फक्त एका जाती किंवा धर्माचा नाही, तर सगळ्यांच्या हक्कासाठी असल्याचे इम्तियाज जलील यांच्याकडून सांगितले जात असले तरी या मोर्चाचे नेतृत्व एमआयएमकडेच राहणार आहे. 

शहरातील आझाद चौक या मुस्लिम बहुल भागातून 20 डिसेंबर रोजी मोर्चाला सुरूवात होणार आहे. दुपारी दोन वाजता निघणारा हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकून आपला विरोध दर्शवणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काढण्यात येणारा औरंगाबादेतील मोर्चा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा ठरावा यासाठी इम्तियाज जलील हे प्रयत्न करत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका, विविध सामाजिक संस्था, संघटना, विद्यार्थ्यांशी संपर्क साधत त्यांनी देखील मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन इम्तियाज जलील यांच्यामार्फत केले जात आहे. 

या शिवाय शहरातील प्रत्येक मशीदीमधून मोर्चात सहभागी होण्यासाठी मौलवीनी आवाहन करावे अशी विनंती देखील एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे. एकंदरित सीसीए व एनआरसीच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एमआयएम पुन्हा एकदा औरंगाबाद आणि मराठवाड्यात आपली ताकद वाढवण्याचा जोरदार प्रयत्न करतांना दिसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com