mim ovesi | Sarkarnama

मुंबईत "एमआयएम'च्या ताकदीचा भ्रम संपला !

शाम देऊलकर 
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

. देशाच्या आर्थिक राजधानीतील मुस्लिम समाजाच्या एकगठ्ठा मतांमुळे या हैदराबादी पक्षाचे खरे लक्ष्य मुंबई महापालिका होते, त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू होती. दक्षिण मुंबईच्या मदनपुरा, मोमीनपुरा या भागावर त्यांची मदार होती. परंतु या भागातून एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. वर्षानुवर्षे मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळवणाऱ्या समाजवादी पक्षाला दणका देण्याची एमआयएमची योजना या निवडणुकीत काही पूर्ण होऊ शकली नाही. 

मुंबई, ः महापालिका निवडणुकीआधी मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या "एमआयएम'ला मुंबईत केवळ दोन जागा मिळाल्याने या पक्षाचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. प्रामुख्याने मुस्लिम समाजाचे राजकारण करणाऱ्या या पक्षाने या निवडणुकीत शहरात खाते जरी खोलले असले तरी येथील मुस्लिम वस्त्यांमध्ये पूर्वापार रूजलेल्या समाजवादी पक्षाच्या तुलनेत एमआयएमला प्रतिसाद कमी मिळाला आहे. मुस्लिम पट्ट्यात एमआयएम आठ ते दहा जागा जागा मिळवून किंगमेकरच्या भूमिकेत राहील, हा बऱ्याच राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज फोल ठरला आहे. 

दोन वर्षांपूर्वी राज्य विधानसभेत दोन सदस्य निवडून आणून या पक्षाने खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत या पक्षाने सर्वांना दखल घ्यायला लावली. परंतु देशाच्या या आर्थिक राजधानीतील मुस्लिम समाजाच्या एकगठ्ठा मतांमुळे या हैदराबादी पक्षाचे खरे लक्ष्य मुंबई महापालिका हे होते, त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू होती.

दक्षिण मुंबईच्या मदनपुरा, मोमीनपुरा या भागावर त्यांची मदार होती. परंतु या भागातून एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. वर्षानुवर्षे मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळवणाऱ्या समाजवादी पक्षाला दणका देण्याची एमआयएमची योजना या निवडणुकीत काही पूर्ण होऊ शकली नाही. 59 जागा लढवणाऱ्या एमआयएमचे वांद्रे पुर्वमधुन गुलनाझ कुरेशी व चिता कॅंपमधून शहनवाझ शेख हे दोन सदस्य निवडून आले आहेत. तिकडे विदर्भातील अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत मात्र तब्बल अकरा नगरसेवक निवडून आणून एमआयएमने सर्वांना दखल घ्यायला लावली आहे. 
आमची ही सुरवात -वारीस पठाण 
या निवडणुकीत आम्ही खाते खोलले असून ही तर फक्त सुरवात आहे. आमचे दोघेजण जरी निवडून आले तरी आम्ही लोकांच्या मनात स्थान मिळवले असून आमच्या पक्षाने सर्वांना दखल घ्यायला लावली आहे असे "एमआयएम' पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनी सांगितले. भायखळ्यात जरी आमचा उमेदवार निवडून आला नसला तरी आम्ही आमचे मताधिक्‍य कायम ठेवले आहे. भविष्यात "मजलिस' मुंबईत नक्कीच प्रगती करेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख