MIM Mufti supporters confused in hospital saying "no phone picks up" | Sarkarnama

"फोन क्‍यु नही उठाते' म्हणत "एमआयएम' आमदार मुफ्ती समर्थकांचा दवाखान्यात गोंधळ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

संशयीत खलील शेख यांना न्यायालयाच्या आदेशानुसार उपचारासाठी दाखल केले आहे. उद्या त्याचा अहवाल न्यायालयाला द्यावयाचा होता. त्यामुळे मारहाणीचा हा प्रकार निंदनीय आहे. जिल्हा आरोग्य अधिक्षकांना या प्रकाराची माहिती कळविली आहे. - डॉं. किशोर डांगे,
वैद्यकीय अधिक्षक, सामान्य रूग्णालय, मालेगाव.

मालेगाव  मैने अठरा बार फोन किया. तुम फोन क्‍यु नही उठाते?. क्‍या खेल लगा रखा है?. पैसे लेकर कुछ भी काम करते हो? अशा आरोपांची सरबत्ती करीत "एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. 

आमदारांच्या समर्थकांनी तर लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहान केल्याने मालेगावचे रुग्णालय काल पहाटे तीनपर्यंत जागे होते. अर्थात वैद्यकीय कामासाठी नव्हे तर डॉक्‍टरांना काम करु दिले जात नाही म्हणून.

आमदार समर्थकांनी घातलेल्या गोंधळाने रुग्णालयातील कर्मचारी भयभीत झाले. हा गोंधळ झाल्यावर तासाभराने पोलिस रुग्णालयात आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले.

त्यावर पोलिसांनी निवेदन नको तक्रार द्या असे सांगतील्याने रात्री दोन पर्यत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. मध्यरात्री अडीचला गुन्हा दाखल करम्यात आला. तोपर्यंत सर्व कर्मचारी रुग्णालयाबाहेर जमून घोषणा देत होते. 

या गोंधळात रुग्णालयाचे सर्व कर्मचारी पहाटे तीनपर्यंत जागे राहून आंदोलन करीत होते. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर आणीबाणीची वैद्यकीय स्थिती असतांना त्यांच्यावर ही वेळ आली.

येथील महेशनगर भागातील माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान गोळीबार प्रकरणातील संशयीत मालेगाव महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती खलील शेख न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

याचा आमदार मुफ्ती व त्यांच्या समर्थकांचा तीळपापड झाला. त्याचे पर्यावसान गोंधळात झाले. दरम्यान सामान्य रुग्णालयातील गोंधळ व हाणामारी प्रकरणी आमदार मुफ्ती, नगरसेवक प्रा. रिझवान खान यांसह दहा ते पंधरा जणावंर दंगल, शासकीय कामात अडथळा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

खलील शेख कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचे निकटवर्तीय आहेत. सध्या एमआयएम आणि कॉंग्रेसच्या आमदारांती विस्तवही जात नाही. त्यामुळे शेख यांना रूग्णालयात दाखल करून घेतल्याने आमदार मुफ्ती यांचा संताप झाला.

त्यांनी प्रा. रिजवान खान व त्यांच्या वीसपेक्षा अधिक समर्थकांनी सामान्य रूग्णालयात गोंधळ घातला. यात वैद्यकीय अधिक्षक डॉं. किशोर डांगे यांना कार्यालयात घुसून धक्काबुक्की व दोघा कर्मचारींना मारहाण केली.

...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख