एमआयएमच्या दबावामुळेच शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी -इम्तियाज जलील 

एमआयएमने शहरातील नागरिक प्रश्न राज्य आणि केंद्र पातळीवर उचलून धरल्यामुळेच रस्त्यांसाठी महाराष्ट्रातील सरकारने निधी दिला असे म्हणत एमआयएम खासदार इमतियाज जलील यांनी रस्त्याच्या निधीचे श्रेय घेतले आहे
MIM Mp Imtiaz Jaleel Takes Credit of Road Funds
MIM Mp Imtiaz Jaleel Takes Credit of Road Funds

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी रुपयांचा निधी दिला. शिवसेनेकडून या निधीचे श्रेय घेतले जात असताना 'एमआयएम'ने मात्र आमच्या दबावामुळेच सरकारने निधी दिला दिला असल्याचा दावा केला आहे.

एमआयएमने शहरातील नागरिक प्रश्न राज्य आणि केंद्र पातळीवर उचलून धरल्यामुळेच रस्त्यांसाठी महाराष्ट्रातील सरकारने निधी दिला असे म्हणत 'एमआयएम' खासदार इमतियाज जलील यांनी रस्त्याच्या निधीचे श्रेय घेतले आहे. 'एमआयएम' नगरसेवकाच्या वार्डातील विकासकामांची उद्घाटन करण्यासाठी इम्तियाज जलील आले असताना त्यांनी या शहराचा चेहरा-मोहरा 'एमआयएम' दबावामुळेच बदलत असल्याचा दावा केला.

इम्तियाज जलील म्हणाले,  ''मी जेव्हा आमदार होतो तेव्हा शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता .जिथे कुठे लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात जायचो तेव्हा लोक मला तुमच्या कचऱ्याचे काय झाले हा प्रश्न हमखास विचारायचे. कचरा प्रश्न मुळे या शहराची राज्य आणि देशपातळीवर वाईट चर्चा झाली. आज हा प्रश्न पूर्णपणे मिटला नसला तरी बऱ्याच अंशी दिलासा मिळाला आहे. यामागे महापालिकेत आमच्या नगरसेवकांनी उठवलेला आवाज आणि मी विधानसभा आणि त्यानंतर केंद्रात केलेला पाठपुरावा हे कारण आहे. या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणूनच आज शहरात रस्ते, कचरा व इतर प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागल्याचे चित्र आहे.''

''शहराच्या पन्नास किलोमीटर अंतरावर जायकवाडी सारखे मोठे धरण आहे .दोन वर्षात या धरणात पावसाचे पाणी भरपूर साठले, अनेकदा धरणाची दरवाजे उघडून ते नदीपात्रात सोडावे लागले. इकडे शहरात मात्र लोकांना पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही. कारण आपल्याकडे जायकवाडीतून पाणी वाहून आणण्याची यंत्रणाच नाही.  महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या राज्यसभेतील एका खासदाराच्या कंपनीला पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम देण्याचा प्रयत्न केला , परंतु मी आणि महापालिकेतील आपल्या नगरसेवकांनी तो हाणून पाडला. आज हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे,'' असेही जलील म्हणाले. 

'एमआयएम'मुळेच सोळा विमाने

''ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या आपल्या शहरातून काही वर्षांत फक्त अडीच विमाने उडत होती. त्यातील एक दिल्ली , मुंबई आणि एक फक्त हैदराबादला जायचे म्हणून अडीच. परंतु ऐतिहासिक अजंठा, वेरूळ लेणी आणि शहरातील अनेक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत ही इच्छा होती. त्यासाठी विमान सेवेचे जाळे विस्तारणे गरजेचे होते. खासदार झाल्यानंतर केंद्रामध्ये मंत्र्यांकडे जाऊन पाठपुरावा केला. विमान कंपन्यांशी पत्रव्यवहार केला,  त्यामुळे आज औरंगाबादच्या इतिहासात कधी नव्हे ते सोळा विमाने झेपावत आहेत," असे सांगत तुमच्या सगळ्यांची साथ असली तर लवकरच औरंगाबादहून थेट दुबईसाठी देखील विमान सेवा सुरू केली जाईल, असा विश्वास देखील इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला .

देशातील वातावरण पाहता सगळ्यांनी शांतता आणि बंधुभाव कायम राखण्याची गरज असल्याचे आव्हान देखील इमतियाज जलील यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com