MIM leader Owaisi's bullet ride ; an IAS officer pays fine fine for not wearing helmet | Sarkarnama

ओवेसींची सुसाट बुलेटस्वारी, भुर्दंड भरी आयएएस अधिकारी

सरकारनामा
मंगळवार, 29 जानेवारी 2019

ओवेसी यांनी विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्याबद्दल दंड भरावा म्हणून त्यांना काही जण ट्रोल करीत आहेत.

 

हैदराबाद :  एमआयएमचे नेते आणि खासदार असदोद्दीन ओवेसी यांना बुलेट मोटारसायकल चालविण्याची हौस आहे. हैदराबाद येथे 25 जानेवारी रोजी तेलंगणाचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांना आपल्या पाठीमागे बसवून ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी त्यांनी केली.

उड्डाणपूल, नवीन रस्ते आणि मीर आलम तलावाची पाहणी झाल्यानंतर तेलंगणाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अरविंद कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ओवेसी यांच्या सोबतच्या बुलेट राईडची छायाचित्रे प्रदर्शित केली.

 

 

त्यानंतर थोड्याच वेळात ट्विटरवर अनेक नागरिकांनी अरविंद कुमार आणि असदोद्दीन ओवेसी यांना हेल्मेट घातले नाही म्हणून टीकेचे लक्ष केले. त्यावर ही छायाचित्रे मुख्य रस्त्यावरची नाहीत. अंतर्गत रस्त्यांवरची आहेत. जेथे चार चाकी गाडी जाऊ शकत नाही असे थोडेच अंतर आम्ही दोघे मोटरसायकलवर बसलो होतो, असा दावा अरविंद कुमार यांनी केला.

मात्र हैदराबाद परिसरातील नागरिकांनी चार दिवस श्री. ओवेसी आणि अरविंद कुमार यांना हेल्मेट वापराचे फायदे सांगणारे ट्विट करून हैराण केले. खासदार आणि आयएएस अधिकारी दोघेही भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याने त्यांनी असेच वर्तन केल्यावर कसे व्हायचे? वगैरे-वगैरे उपदेशाचाही पाऊस पडला.

ओवैसींच्या एका  वर्गमित्राने ओवैसी अजूनही पूर्वीच्या भरधाव वेगाने बुलेट चालवतात का असेही त्या अधिकाऱ्याला विचारले . 

अखेर तीन  दिवसांनंतर सोमवारी ( ता . २८) अरविंद कुमार यांनी स्वतःहून पोलिसांकडे दंड जमा केला आहे. मोटारसायकलवर पाठीमागे हेल्मेटशिवाय बसल्याबद्दल 135 रुपये दंडाचे चलन त्यांनी वाहतूक पोलिसांकडे भरले. त्यानंतर दंडाच्या पावतीचे छायाचित्र  अरविंद कुमार यांनी ट्विटरवर टाकले आहे.

एमआयएम चे नेते असदोद्दीन ओवेसी यांनी अरविंद कुमार यांच्या दंडाच्या पावतीचे ट्विट रिट्विट केले आहे. त्यानंतर आता काही हैदराबादकर ओवेसींना तुम्ही दंड भरला का? अशी विचारणा करीत आहेत. ओवेसी यांनी विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्याबद्दल दंड भरावा म्हणून त्यांना काही जण ट्रोल करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख