परभणी महापालिका निवडणुक:‘एमआयएम’ची एन्ट्री

परभणी महापालिका निवडणुक:‘एमआयएम’ची एन्ट्री

परभणी:   यंदा पहिल्यांदाच चौरंगी, पंचरंगी लढती पहायला मिळत आहेत. भाजप ताकतीने आखाड्यात उतरली असताना दुसरीकडे ‘एमआयएम’नेही दंड थोपटल्याने बहूरंगी लढतीचे संकेत दिले आहेत. हे कमी असताना महाघाडीच्या एन्ट्रीने उमेदवारांच्या भाऊगर्दीने कोणत्याही एका पक्षाला सत्तेचा सोपान चढता आता शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.

परभणी जिल्हा हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु महापालिकेत शिवसेना कमाल दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकली नाही. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न या वेळी पक्षाला करावा लागेल. पक्षातंर्गत गटबाजी, तिकीटासाठी चढाओढ, मुस्लिम मतदार आदी कारणांमुळे मर्यादा पडतात. तूर्तास शिवसेना जोमात असली तरी जिल्हा परिषदेसारखी अवस्था होऊ नये, अशी अपेक्षा आहे.
 दुसरीकडे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. विद्यमान नगरसेवक काँग्रेसमध्ये आणून त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले असताना सर्वाधिक मुस्लिम उमेदवार देऊन राष्ट्रवादीची ‘स्ट्रेंथ’ दुबळी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, मुस्लिम आणि दलित मतदारांचा प्रभाव असलेल्या प्रभागात या दोन पक्षांत ‘हाय व्होल्टेज’ लढती होतील, यात शंका नाही. 
‘एमआयएम’च्या आगमनामुळे या दोघांच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याची भिती प्रमुख नेत्यांना वाटू लागली आहे. कारण आतापर्यंत दोघांत कुस्ती लागली तरी विजय शेवटी त्याच विचाराचा होता.

शिवाय, भाजप सर्व ताकतीनिशी मैदानात उतरल्याने बहूरंगी लढतीचा पहिला बदल झाला. शिस्त, एकवाक्यता, उमेदवारांची आयात आणि ओढा पाहता ताकतवान उमेदवार भाजपला मिळाले आहेत. ते सर्व ताकद पणाला लावण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. याहीपेक्षा दुहेरी आकड्यापर्यंत जाण्याचे मनसुबे ठेवून तयारी केल्याने सर्वच पक्षांसह मतदारांचे लक्ष भाजपने खेचले आहे. दुसरीकडे महाआघाडीने उमेदवारी देवून मतदारांत पर्याय दिला आहे. तो सक्षम नसला तरी पाडापाडीसाठी त्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाज, अनुमान बदलण्याची शक्यता असून लढती बहूरंगी करण्याच महत्वाची भूमिका बजावली आहे.

विविध पक्षांची उमेदवारी जाहीर झाली, प्रचार सुरु झाला असला तरी बहुतांश पक्षांच्या त्या-त्या प्रभागाच्या पॅनेलमधील उमेदवारांची सांगड बसली नसून ते एकएकट्यानेच प्रचार करीत असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. काही पक्षांमध्ये एका प्रभागातील एका गटात १२ ते १६ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. आपआपल्या कुवतीप्रमाणे सर्वस्व पणाला लावले होते. आपल्या गाॅडफादरच्या माध्यमातून वरीष्ठ पातळीपर्यंत फिल्डींग लावली होती. काहींनी चारचा पॅनेल करुनच उमेदवारी मागितली होती. काही जण तर प्रचाराला देखील लागले होते.

तिकीट वाटपानंतर चित्र बदलले...
तिकीट वाटपात प्रभागातील प्रमुख उमेदवारांच्या मनाप्रमाणे फासे पडले नाहीत. काही सोयीचे उमेदवार मिळाले, काहींना विरोधक मिळाले तर काहींना नवखे साथीला मिळाले. त्यामुळे त्यांचे प्रचाराचे गणित कोलमडले. आलेल्यांना सोबतीला घेऊन प्रचार करण्याचे, त्यांना जुळवून घेण्यासाठी काही उमेदवार आढे-वेढे घेतांना दिसून येत आहेत. ज्यांनी शेवटी उमेदवारी जाहिर झाले ते मात्र भांबावलेले असून त्यांना काही सुचेनासे झाले आहे. अन्य उमेदवारांनी अगोदरच गाठीभेटीच्या फेऱ्या पूर्ण केल्या. आपण मागे पडलो म्हणून काही जण सकाळपासून एकला चलो रे करत प्रभागात घरे धुंडाळतांना दिसून येत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com