MIM Corporator Matin may loose his post | Sarkarnama

वाजपेयींच्या श्रद्धांजलीस विरोध : मतीनचे नगरसेवक पद जाणार ? 

सरकारनामा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मतीन यांना आज पोलिसांनी अटक केलेली आहे . 
यापुढे प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या वेळी सय्यद मतीन यास सभागृहात प्रवेश करण्यास मज्जाव केले जाईल.  मतीन यास प्रवेश देऊ नये असे महापौरांनी  सुरक्षारक्षकाना सांगून ठेवले आहे .

औरंगाबाद :  भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावास विरोध करणा-या सय्यद मतीनचे नगरसेवकपद कायमचे रद्द करावे, असा ठराव  सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला आहे .

हा प्रस्ताव  महापालिका आयुक्त  सोमवारी शासनाकडे पाठविण्याची शक्‍यता आहे. एमआयएमच्या मतीनचे सभागृहातील कारनामे उजेडात आणणारे फोटो आणि व्हिडीओ देखील शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे समजते . 

 एमआयएमचे नगरसेवक  मतीन सभागृहात  नेहेमी वादग्रस्त  वक्तव्य करतात . त्यांना भडकावू आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे करण्याची सवय आहे . 

महापालिकेच्या शुक्रवारी (दि.17) झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजलीचा प्रस्ताव मांडण्यात आला. याप्रस्तावास एमआयएमचे नगरसेवक मतीन याने वादग्रस्त विधान करीत विरोध केला. त्यामुळे सभागृहात मोठा राडा झाला. भाजपच्या नगरसेवकांनी मतीन यास चांगलाच चोप दिला होता . 

त्यानंतर उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन याचे नगरसेवकपद कायमसाठी रद्द करावे, अशा प्रस्ताव मांडला. यास सभागृह नेता विकास जैन, राजू वैद्य, प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, गजाजन बारवाल, रामेश्वर भादवे यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव सभागृृहात एकमताने मंजूर करण्यात आला.

शनिवारी (दि.18) मांडलेला प्रस्ताव आणि मंजूर झालेला ठराव याचा कारणापुरता उतारा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाठविला. आयुक्त स्वतः याघटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यानी मतीन याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव, तातडीने शासनाकडे मंजूरीसाठी पाठवावा. अशा सुचना महापौर घोडेले यांनी केल्या.

नगरसेवक मतीन याने शुक्रवारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावास विरोध करुन सभागृहात गोंधळ घातला. त्याचे वर्तन अक्षम्य आणि घृणास्पद आहे. यापुर्वीही वंदे मातरम  सुरु असताना मतीन याने गोंधळ घालून अवमान केलेला आहे.त्यामुळे त्याचे सदस्य कायमचे रद्द करावे, अशा प्रस्तावासोबत सबळ पुरावा म्हणून त्या दिवशी सभागृहातील चित्रफीत आणि फोटोग्राफ्सही पाठविण्याचे आदेश महापौर घोडेले यांनी दिले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख