शिवसेनेचे अंबादास दानवे आमदार झाले; पण धुमशान एमआयएममध्ये रंगले

शिवसेनेचे अंबादास दानवे आमदार झाले; पण धुमशान एमआयएममध्ये रंगले

औरंगाबादः जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याच्या कारणावरून एमआयएमध्ये सुरू असलेल्या वादावादीनंतर अखेर पक्षाचे महापालिकेतील गटनेते नासेर सिद्दीकी यांची उचलबांगडी करण्यात आली. गंगाधर ढगे यांची त्यांच्या जागेवर गटनेता म्हणून निवड करण्यासाठी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख अहमद यांनी काल महापौरांना पत्र दिले.

नुकत्याच झालेलया जालना- औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे विक्रमी मते घेऊन विजयी झाले होते. यात त्यांना अनेक पक्षांच्या अदृश्‍य हातांची मदत झाल्याची चर्चा नंतर रंगली होती. महायुतीकडे असलेल्या संख्याबळापेक्षा कितीतरी अधिकची मते मिळाल्यामुळे कॉंग्रेस, एमआयएम व इतर पक्षांची मोठ्या प्रमाणात मते फुटल्याचे निकालानंतर समोर आले होते.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात शहरात कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या एमआयएम पक्षाने देखील शिवसेनेला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एमआयएम नगरसेवकांसोबत "सेटींग' करण्यासाठी दोन नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात होते. निकालानंतर हे नगरसेवक काही काळासाठी अंडरग्राऊड देखील झाले होते. शिवसेनेला मदत केल्यामुळे एमआयएममध्ये दुफळी निर्माण झाली होती. तेव्हापासून या सेटींगबाज नगरसेवकांचा शोध सुरू होता. त्यांचा शोध लागताच गटनेता बदलण्यासाठी नगरसेवकांनी सह्यांची मोहिमही सुरू केली होती.

पण वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना काही काळ शांत राहण्यास सांगितल्यामुळे ही मोहिम थंडावली होती. आज अचानक एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख अहमद शेख इलियास यांनी महापौरांना पत्र देत एमआयएमच्या गटनेतेपदी नासेर सिद्दीकी ऐवजी गंगाधर ढगे यांची निवड करण्याची मागणी केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममधील ही खदखद समोर आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com