मालाड : चमत्कार झाला एमआयएमचा उमेदवारच कॉंग्रेसमध्ये आला !

Malad Aslam shekh cong
Malad Aslam shekh cong

मुंबई  : मतदानाला फक्त चार दिवस असल्याने सर्व पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात जोर लावला आहे; परंतु प्रचारासाठी निघालेल्या एमआयएमच्या उमेदवाराने थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलले आहे.


मतदानाचा दिवस जवळ आल्याने सर्व उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार करून मतदारांशी संपर्क साधत आहेत. मालाडमधील एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख प्रचारासाठी सकाळी घराबाहेर पडले. सायंकाळी ते कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी मालवणीत आयोजित केलेल्या सभेत पोहोचले.


 तिथेच त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून अस्लम शेख यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे एमआयमचे कार्यकर्ते चक्रावून गेले; मात्र "कॉंग्रेस झिंदाबाद' बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.


उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात मालाड हा एकमेव विधानसभा मतदारसंघ 10 वर्षांपासून कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडील ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत. त्यासाठी कांदिवली पूर्व येथील कॉंग्रेसचे माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मालाडमधून उमेदवारी देण्यात आली.

कॉंग्रेसने आमदार अस्लम शेख यांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. या मुस्लिमबहुल मतदारसंघात एमआयएमने इस्माईल शेख यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेसच्या अडचणींत वाढ झाली होती.


युतीसमोर मोठे आव्हान
एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख यांनी जोरदार प्रचार करून कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रमेशसिंग ठाकूर यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात होते; परंतु इस्माईल शेख यांनी अस्लम शेख यांना पाठिंबा दिल्याने एमआयएमला झटका बसला असून, कॉंग्रेसला बळ मिळाले आहे.

या घडामोडीमुळे मालाडमधील लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी झाली असून, हा विधानसभा मतदारसंघ जिंकण्याच्या तयारीत असणाऱ्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com