mim in aurangabad | Sarkarnama

औरंगाबादमध्ये "एमआयएम'कडून महावितरणच्या कार्यालयात तोडफोड 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात एमआयएमच्या दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या तोडत प्रवेश केला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याने एमआयएम कार्यकर्ते अधिकच संतापले. जनतेला लोडशेडिंगचे चटके देता आणि तुम्ही एसीची हवा खाता म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातील एसीच उखडून फेकला. दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयात गोंधळ सुरु होता. 

औरंगाबाद : महावितरणकडून शहरातील दलित आणि मुस्लिम भागातच आठ ते नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात असल्याचा आरोप करत एमआयएमने महावितरण कार्यालयात तोडफोड केली. आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात एमआयएमच्या दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या तोडत प्रवेश केला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याने एमआयएम कार्यकर्ते अधिकच संतापले. जनतेला लोडशेडिंगचे चटके देता आणि तुम्ही एसीची हवा खाता म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातील एसीच उखडून फेकला. दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयात गोंधळ सुरु होता. 

शहराच्या विविध भागात सध्या महावितरणकडून लोडशेडिंग केले जात आहे. परंतु शहरातील मुस्लिम आणि दलित बहुल भागात महावितरणकडून जादाचे लोडशेडिंग केले जात असल्याचा एमआयएमचा आरोप होता. या संदर्भात आज (ता. 6) दुपारी तीनच्या सुमारास इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या दोनशेवर कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांनी संरक्षक भितीच्या जाळ्या तोडून कार्यालयात प्रवेश केला. 

हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे दालन गाठले. आमदार इम्तियाज जलील, जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम नाईकवाडी हे यावेळी दालनात गेले तेव्हा तिथे मुख्य अभियंता नव्हते. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते अधिकच भडकले. लोकांना उकाड्यात आणि अंधारात ठेवून इथे एसीची हवा घेतली जात असल्याचे म्हणत काही कार्यकर्त्यांनी दालनातील एसी, टेबलावरील काच, फोन उखडून फेकले. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले. पोलीसांनी जमवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. आमदारांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत मुख्य अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय इथून हालणार नाही अशी भूमिका घेतली. 

ओमप्रकाश बकोरीयाशी चर्चा 
महावितरण कार्यालयातील तोडफोड आणि चिघळलेल्या परिस्थीतीची माहिती मिळताच महावितरण प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया तातडीने कार्यालयात आले. संतप्त जमावाला शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी इम्तियाज जलील यांच्यांशी स्वंतत्रपणे चर्चा केली. मुंबईतील महावितरणच्या कार्यकारी संचालकांशी संपर्क साधून लोडशेडिंग बाबत दुजाभाव केला जाणार नाही. शहरातील लोडशेडिंग बंद करण्या संदर्भात प्रस्ताव पाठवल्यास विशेष परवानगी घेऊन शहरातील लोडशेडिंग बंद करण्याचा निश्‍चित विचार करू असे आश्‍वासन इम्तियाज जलील यांना देण्यात आले. लोडशेडिंगचा नियम राज्यात सगळ्याच भागांसाठी समान असेल असे देखील यावेळी सांगण्यात आले. या चर्चेनंतर इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले व हा जमाव महावितरण कार्यालयातून निघून गेला. 

 भेदभाव खपवून घेणार नाही- इम्तियाज जलील 
राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजेचे संकट निर्माण झाले आहे, ते आम्ही झेलायला तयार आहोत. पण लोडशेडिंगच्या बाबतीत केला जाणारा भेदभाव आम्ही कदापी खपवून घेणार नाही. शहराच्या अनेक भागात दोन तास तर काही भागात 8-9 तासांचे लोडशेडिंग केले जाते. जी-1, जी-2 ची कारणे महावितरणचे अधिकारी देतात. सर्वसामान्यांना त्याच्याशी काही देणघेण नाही. जो वीज बील भरतो त्याला पुर्णवेळ वीज मिळाली पाहिजे. जे बील भरत नाहीत त्यांच्यामुळे आम्हाला त्रास का? पोलीस घेऊन जा आणि वीजबीलाची वसुली करा. सर्वसामान्य नागरिक घामाघूम झालेला असतांना महावितरणचा एकही अधिकारी म्हणणे ऐकून घ्यायला येत नाही ही मुजोरी चालणार नाही. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयातील एसी व इतर साहित्यांची तोडफोड केली आहे. आमचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जाऊन बसलेत, पोलिसांनी त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची ती करावी, आम्ही पळून जाणार नसल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख