"एमआयएम'ला आत्मविश्वास की ओव्हर कॉन्फिडन्स ?

 "एमआयएम'ला आत्मविश्वास की ओव्हर कॉन्फिडन्स ?

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर दहा हत्तींचे बळ आलेल्या "एमआयएम'ने वंचित बहुजन आघाडी सोबत फारकत घेत स्वबळावर राज्यातील विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा हा आत्मविश्वास की ओव्हर कॉन्फिडन्स अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे "एमआयएम' महाराष्ट्रात आपले हातपाय पसरू पाहत आहे. असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित येण्यामुळे लोकसभा निवडणुकीत या आघाडीला चाळीस लाखाहून अधिक मते मिळाली होती. 

औरंगाबादेत एमआयएम आणि वंचित ने चमत्कार घडवत महाराष्ट्रातला पहिला खासदार संसदेत निवडून पाठवला. इम्तियाज जलील यांच्या विजयात जिल्ह्यातील दलित आणि वंचित समाजाच्या मतांचा मोठा वाटा होता. निवडणूक निकालानंतर मतदारसंघनिहाय समोर आलेल्या आकडेवारीने ते सिद्धही झाले आहे.परंतु लोकसभा निवडणुकीतील विजय हा आपल्या ताकदीवर झाल्याचा समज करत एमआयएमच्या अपेक्षा वाढल्या. विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटीतून हे स्पष्ट झाले. वंचित बहुजन सोबत आघाडीची चर्चा सुरू झाली तेव्हा एमआयएमने तब्बल शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती . 

औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याआधी जी एमआयएम ग्रामीण आणि शहरी भागात आपली ताकद नाही, त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही अशी चर्चा करत होती. तिच एमआयएम लोकसभेतील विजयानंतर मात्र राज्यभरात शंभर जागांवर दावा करू लागली. विशेष म्हणजे दलित वंचितांच्या मतांवर एमआयएमला औरंगाबादेत विजय मिळवता आला, पण वंचितच्या इतर लोकसभा उमेदवारांना मुस्लिम मतांचा म्हणावा तसा फायदा मात्र झाला नाही. स्वतः प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर मतदारसंघातून पराभूत झाले. 

दलित मतांचा वापर औरंगाबादेत करून घेण्यात आला, पण मुस्लिमांनी प्रकाश आंबेडकरांना मात्र मदत केली नाही असा आरोप करत आंबेडकरांनी देखील एमआयएमला त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच शंभर जागा मागणाऱ्या एमआयएम आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इमतियाज जलील यांना केवळ आठ जागाचा प्रस्ताव देण्यात आला. प्रकाश आंबेडकरांकडून अशाप्रकारे एमआयएमची खिल्ली उडवण्यात आल्यामुळे संतापलेल्या इम्तियाज जलील आणि ओवैसी यांनी थेट वंचित आघाडीला तलाक देण्याचाच निर्णय घेऊन टाकला. आता दोन्ही बाजूने अजूनही आम्ही एकत्र येऊ शकतो अशी भाषा सुरू झाली आहे. मात्र 'पहिले आप ' ची भूमिका कुणी वाढवायची यावर घोडे अडले आहे. 

एमआयएमने स्वतंत्र मुलाखती घेत राज्यात 74 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या जागा लढवण्या इतपत एमआयएमची स्वतंत्र यंत्रणा कितपत सक्षम आहे हा प्रश्न कायम आहे. औरंगाबाद जिल्हा आणि मराठवाड्याचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश डोक्‍यात ठेवून जर विधानसभा निवडणुकीची बांधणी केली गेली तर मात्र एमआयएमला फटका बसण्याची अधिक शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात एमआयएमला लोकसभा निवडणुकीत भरभरून मते मिळण्यामागे वंचित सोबत त्यांची असलेली आघाडी कारणीभूत ठरली होती. परंतु विधानसभेत आता हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्यामुळे एमआयएमचे गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील पूर्व पश्‍चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात विजयाची खात्री बाळगून असलेल्या एमआयएमला शिवसेना-भाजप युती झाल्यास मोठे आवाहन असणार आहे. ग्रामीण भागात वैजापूर ,कन्नड, पैठण, सिल्लोड, गंगापूर , फुलंब्री या भागात एमआयएमला मर्यादा आहेत. कार्यकर्त्यांचे जाळे आणि प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पक्षाकडे नाही. शिवाय सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार आपापल्या मतदारसंघात प्रभाव राखून असल्याने एमआयएमला पहिल्याच निवडणुकीत ग्रामीण भागात कितपत यश मिळेल हे सांगणे कठीण आहे. 

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचा विचार केला, तर नांदेड आणि बीड वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये एमआयएमची फारशी ताकद नाही. बीडमध्ये या पक्षाला आधीच फुटीचे ग्रहण लागलेले आहे. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.ज्या नांदेड जिल्ह्यातून एमआयएमचा उगम झाला, त्या नांदेड महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांनी या पक्षाची पुरती कोंडी करत त्यांचा सफाया केला आहे. एमआयएमने नांदेड उत्तर मधून फिरोज लाला यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी एकट्या मुस्लिम समाजाच्या मतांवर त्यांना विजय मिळवणे कठीण दिसते. बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी या मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत जी काही मत वंचित बहुजन आघाडी म्हणून मिळाली, ती आता दुरावण्याची शक्‍यता आहे. परिणामी मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागांमध्ये स्वतंत्रपणे लढवण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमला कितपत यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com