एमआयएमचा निलंबित नगरसेवक मतीन हातकड्यासह मतदानाला

एमआयएमचा निलंबित नगरसेवक मतीन हातकड्यासह मतदानाला

औरंगाबाद : जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे. एमआयएमचे निलंबित व बलात्काराच्या आरोपाखाली तुरूगांत असलेले नगरसेवक सय्यद मतीन याने देखील मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी एकच्या सुमारास मतीन यास हातकड्यांसह पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी आणण्यात आले होते. 

औरंगाबाद - जालना विधान परिषदेची निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीकडे बहुमताचा जादुई आकडा असूनदेखील शिवसेनेने अतिरिक्त मतांची जमवाजमव केली आहे. एमआयएमच्या अनेक नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याची चर्चा असतांनाच आज वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन थेट तुरुगांतून मतदानासाठी तहसील कार्यालयात दाखल झाला. 

काळ्या रंगाचा झब्बा, डोळ्यावर गॉगल, हातात हातकडी आणि बंदूकधारी पोलीस अशा फौजफाट्यासह मतदानाला आलेल्या मतीनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. न्यायालयाच्या परवानगीनंतर मतीनला मतदानासाठी आणण्यात आले होते. सातत्याने पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या सय्यद मतीन यास सहा महिन्याआधी एमआयएममधून निलंबित करण्यात आले होते. 

अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास विरोध केल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात मतीन याला मारहाण केली होती. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी झाली होती. याची गंभीर दखल घेत असद्दुदीन ओवेसी यांनी मतीन याची पक्षातून हाकलपट्टी करत त्याला निलंबित केले होते. हे प्रकरण राज्यभरात गाजले होते. या शिवाय महापालिकेवर उर्दू भाषेतील फलक लावल्यामुळेही मतीन याने पक्षाच्या वरिष्ठांची नाराजी ओढावून घेतली होती. 

वारंवार पक्षाला विश्‍वासात न घेता आंदोलन व भूमिका घेऊन आक्रमक होणाऱ्या सय्यद मतीन याच्यावर कारवाई करा अशी मागमी एमआयएमच्या अनेक नगरसेवकांनी लावून धरली होती. या शिवाय मतीनवर बलात्काराचे दोन गुन्हे देखील दाखल झाले आहेत, सध्या तो जेलमध्ये आहे. विधान परिषदेच्या मतदानासाठी आज मतीनला आणण्यात आल्यामुळे तहसील कार्यालयात त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com