वंचितसोबत आघाडीची वाट न पाहता एमआयएम लागली स्वतंत्रपणे प्रचाराला...

 वंचितसोबत आघाडीची वाट न पाहता एमआयएम लागली स्वतंत्रपणे प्रचाराला...

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी सोबत जागा वाटपाची चर्चा रखडल्यामुळे एमआयएम स्वतंत्रपणे प्रचाराला लागली आहे. एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगावनंतर शनिवारी जालन्यात जाहीर सभा घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. 
एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची 26 ऑगस्ट रोजी पुण्यात झालेली बैठक कुठल्याही निर्णयाशिवाय गुंडाळण्यात आली. खासदार असदुद्दीन ओवेसी आणि वंचितचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या अडीच तास झालेल्या चर्चेनंतरही जागा वाटप निश्‍चित होऊ शकले नाही. 

26 ऑगस्टचा मुहूर्त हुकल्यानंतर आता एमआयएमने स्वतंत्रपणे आपली तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांपुर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी मालेगांव येथे मेळावा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा एमआयएममध्ये प्रवेश करून घेतला. त्यानंतर शनिवारी रात्री जालन्यात त्यांनी जाहीर सभा घेत औरंगाबाद आणि जालन्यात फार अंतर नाही, येणाऱ्या काळात औरंगाबादची पुनरावृत्ती जालन्यात करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 

महाराष्ट्र विशेषतः मराठवाड्यातील 14 जागांच्या मागणीवर एमआयएम ठाम आहे. राज्यातील 74 विधानसभा मतदारसंघाची यादी एमआयएमने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सोपवली होती.26 ऑगस्टला जागा वाटपाची घोषणा केली जाईल असे देखील त्यांना जाहीर केले होते. वंचित बहुजन आघाडीकडून निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल इम्तियाज जलील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 

एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चा देखील त्यामुळे सुरू झाली होती. परंतु ओवेसी आणि आंबेडकर ही आघाडी कायम ठेवतील यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अजूनही विश्‍वास आहे. परंतु आघाडीची वाट न पाहता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. 

मराठवाडा व राज्यातील ज्या भागातील जागांचा एमआयएमने आग्रह धरला आहे, त्या त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सभा आणि मेळावे घेण्याचा धडाका सुरू केला आहे. मालेगाव आणि जालन्यातून त्यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकल्याचे यावरून स्पष्ट होते. वंचित बहुजन आघाडी सोबतची बोलणी अद्याप अंतिम झालेली नसतांना एमआयएमने स्वतंत्रपणे प्रचार सुरू केल्याने याचा विपरित परिणाम वंचित सोबतच्या आघाडीवर होण्याची शक्‍यता देखील वर्तवली जात आहे. 

जालना भी अपना हो गया... 
जालना येथील जाहीर सभेला जमलेली गर्दी पाहून इम्तियाज जलील यांनी "जालना भी अपना हो गया' अशा शब्दांत असदुद्दीन ओवेसी यांना मोठ्या विजयाचा विश्‍वास दिला. मालेगावच्या मेळाव्यानंतर ओवेसींनी आपल्याला "दौरा कैसा रहा' असे विचारले तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वीस नगरसेवक एमआयएममध्ये आल्याचे मी त्यांना सांगितले. " पुरा मालेगाव हरे रंग मे रंग चूका है', जालना भी अपना हो गया है' असे सांगत मराठवाड्यात एमआयएमचा झेंडा फडवण्याचा निर्धार त्यांनी या सभेतून व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com