दूध उत्पादकांच्या नशिबी दोन रूपये तोटाच ..

दूध उत्पादकांच्या नशिबी दोन रूपये तोटाच ..

मुंबई ः महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना आंदोलनानंतर शासनाने भाववाढ दिली की घट असा नवा प्रश्‍न आता विचारला जातो आहे. 27 रूपये प्रती लिटर भावाने दूध खरेदी करा असा निर्णय झाला होता, मात्र आता 25 रूपये लीटरने दूध घ्या असा निर्णय झाला आहे. यात सरळच दोन रूपयांचे नुकसान आहे.

ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सवलत सरकारने दर वाढवले तरी मिळत नाही, त्यामुळे दोन रूपयाची रक्‍कम दलालांना मिळणार, याचा सर्वात मोठा लाभ दूध संघांना होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. 

महाराष्ट्रात दरदिवशी 1 कोटी 20 लाख लीटर दूध तयार होते.त्यातील 40 टक्‍के दूध हे सहकारी संघांतर्फे विकत घेतले जाते. 59 टक्‍के उचल खाजगी क्षेत्राची असून 1 टक्‍का दूध सरकारी दूध योजनेत विकत घेतले जाते. संघांनी पूर्वी 27 रूपये प्रती लीटर या भावाने दूध विकत घेणे अपेक्षित असे.ते नव्या निर्णयानुसार 25 रूपये मोजून विकत घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी केवळ 17 ते 18 रूपये किंमत मोजून प्रती लीटर दूध विकत घेतले जाते. दूध उत्पादकांना नाशीवंत पदार्थ कुठेही साठवणे शक्‍य नसल्याने ते मिळेल त्या भावाला दुध विकतात. नंतर प्रक्रिया करुन हे दूध शहरी भागात विकले जाते. 

सध्या मुंबईत गाईचे दूध 42 रूपये प्रती लीटर या भावाने विकले जाते आहे. याचा अर्थ ग्राहक दर लीटरमागे 17 रूपये दररोज मोजतात याकडे लक्ष वेधून जनता दल मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी उर्वरित रक्‍कम जाते तरी कुठे असा प्रश्‍न केला आहे. दूध संघांशी संपर्क साधला असता दूध संकलित झाल्यावर जो खर्च येतो तो मोठा असतो असे मोघम उत्तर देण्यात आले. 

प्रत्यक्षात दूध संकलित झाल्यावर प्रक्रिेयेवर होणारा खर्च लीटरमागे जेमतेम 12 रूपये असल्याचे स्पष्ट होते आहे. संकलित दुधाचे पाश्‍चरायझेशन करण्यासाठी सर्वाधिक़ रक्‍कम खर्च होते.त्यानंतर हे दूध मुंबई ,पुणे किंवा अन्य शहरांमध्ये पाठवले जाते. मुंबईत वाशीला गोकुळ दुधावर पुन्हा प्रकिया करून ते पिशवीत भरले जाते. अमूलचे प्रक्रियाकेंद्र पालघरपरिसरात आहे. येथे प्रक्रिया झाल्यावर दूध वितरकांकडे जाते, नंतर ते उपवितरकांमार्फत वस्तीवस्तीत पोहोचवले जाते. वितरणासाठी लीटरमागे सामान्यत: मुंबईत 3.50 रूपयांचा खर्च केला जातो. 42 रूपये लीटरमध्ये ही रक्‍कम अंतर्भूत असतानाही कित्येक ठिकाणी जास्तीचे दोन रूपये आकारले जातात. 

मुंबईत 50 लाख लीटर दुध विकले जाते. 40 लाख लीटरवर अधिक रक्‍कम आकारली जाते असे गृहित धरले तरी दररोज 80 लाख लीटर जास्तीचे मिळतात. यातील एकही पैसा दूध उत्पादकाला मिळत नाही. त्यामुळेच दुधातील अतिरिक्‍त रकमेची फार मोठी उलाढाल सुरू असते. संप बंद झाला तरी शेतकऱ्याच्या पदरी नेमके काय पडले असा प्रश्‍न गावातील जनता करीत आहे. 

42 रूपये प्रती लीटरने विकल्या जाणाऱ्या दुधातून शेतकऱ्याला प्रक्रिया खर्च वगळता 30 रूपये देणे शक्‍य असतानाही केवळ 25 रूपये देणे म्हणजे संघांना राजरोस लाभ करून देणे होय असेही नमूद केले जाते आहे. नारकार यांनी या आंदोलनातून दुध संघांचा फायदा झाला की उत्पादकांचा असा प्रश्‍न केला आहे.विकल्या न गेलेल्या 30 टक्‍के दुधासाठी लीटरमागे पाच रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हा पैसाही करदात्यांचा आहे. त्याचा लाभ कुणाला अशी विचारणा सुरू आहे. 

सामाजिक कार्यकर्ते श्री नाईक यांनी दुधातील भेसळीचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांहून जास्त आहे याकडेही लक्ष वेधले आहे. अनुदानापोटी पाच रूपये दूध भुकटीसाठी दिले जाणार असले तरी हा निधी केंव्हा मिळणार शिवाय हे अनुदान कसे मिळणार असा प्रश्‍नही सध्या समोर आला आहे. 
आंदोलनाने नेमके काय साधले हा प्रश्‍न करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेटटी आणि रवीकांत तुपकर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होवू शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com