म्हात्रे- नाईक दिलजमाई फिसकटली

गेली अनेक वर्षे महापालिकेची सत्ता आपल्या हाती ठेवलेले गणेश नाईक कुटुंब आणि नव्याने होऊ पाहत असलेले सत्ताकेंद्र मंदा म्हात्रे यांचे विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे
Manda-Mhatre-Ganesh-Naik
Manda-Mhatre-Ganesh-Naik

नवी मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नाते प्रस्थापित होण्यासाठी पक्षातर्फे सुरू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्याचे समजते आहे. 


महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वीच एका बैठकीत म्हात्रे आणि नाईक यांच्यात दिलजमाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र दोन्ही बाजूंकडून निराशा दाखवल्यामुळे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरले आहेत.


गेली अनेक वर्षे महापालिकेची सत्ता आपल्या हाती ठेवलेले गणेश नाईक कुटुंब आणि नव्याने होऊ पाहत असलेले सत्ताकेंद्र मंदा म्हात्रे यांचे विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे, परंतु दोघांमधील या वैरत्वाचा फायदा महाविकास आघाडीच्या पक्षांना बसू नये, असे भाजप पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. 


एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत नाईकांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आलेले 50 नगरसेवक भाजपकडे असल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे; मात्र राज्यात आलेल्या मविआच्या सत्तेमुळे नवी मुंबईतही मविआचे समीकरण जुळले जाण्याची शक्‍यता आहे. 


या शक्‍यतेमुळे भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीत नवी मुंबई महापालिकेची हातची सत्ता गमावणे भाजपसह नाईकांना महागात पडू शकते. त्याकरता काही दिवसांपूर्वीच नाईक आणि म्हात्रे यांच्यातील वादविवाद संपून मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला होता. 


फडणवीस यांच्या उपस्थित संपन्न झालेल्या या बैठकीत 70 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा नाईकांकडून केल्याचे समजते; तर आपण निवडणुकीची आवश्‍यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून जास्तीत जास्त जागा निवडून आणू, असे आश्‍वासन म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे.

दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्यामुळे भाजपचे निवडणुकीतील पारडे झुकते असले, तरी मनोमीलन करण्यात अपयश आल्याने ही बैठक सपशेल फोल ठरली आहे, परंतु महापालिका निवडणुकीत भाजपच्या दोन्ही आमदारांची मैत्री घनिष्ठ होण्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा प्रयत्न केले जाण्याची शक्‍यता आहे.


महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यात आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात मनोमीलनाचा विषय घेण्यात आला नाही. सर्वांनी एकमताने येणाऱ्या महापालिका निवडणुकींना सामोरे जाऊ.
- रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com