mhaswad police beat armyman in satara district  | Sarkarnama

कुपवाडाहून आलेल्या फौजीला म्हसवड पोलिसांनी त्याच्या घरासमोर फोडून काढले!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

पोलिसांच्या या मारहाणीसंदर्भात दत्ता यांनी एक व्हिडीओ तयार केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

पुणे: पुणे शहरात विविध कारणांनी रस्त्यावर आलेल्या लोकांना पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच पुण्यापासून 200 किलोमीटरवर असलेल्या म्हसवड भागात सातारा ग्रामीण पोलिसांनी भारतील लष्कराच्या जवानाला फोडून काढल्याची घटना घडली आहे. संचारबंदीच्या नावाखाली ग्रामीण भागात पोलिस अतिरेक करत आहेत की काय, अशी शंका यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

या घटनेसंबंधीची अधिक माहिती अशी, दत्ता अंकुश शेंडगे हे मूळ सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील पळसावडे गावचे आहेत. गेल्या 18 वर्षापासून ते भारतीय लष्करात कार्यरत आहेत. सद्या जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे 528 ASC BN मध्ये त्यांची नेमणुक आहे. ते 30 दिवसांच्या सुट्टीसाठी गावी पळसावडे येथे आले आहेत. 

आज सकाळी 10 च्या सुमारास ते त्यांच्या घराच्या अंगणामध्ये साफसफाई करत होते. त्यावेळी एक डॉक्टर रस्त्यावरून निघाले होते. ते डॉक्टर फौजी कधी आला, असे म्हणत त्यांच्या अंगणात आले. तोपर्यंत म्हसवड पोलिसांची गाडी तिथे आली. घराबाहेर कां थांबलाय, असे पोलिसांनी विचारताच ते आत जावू लावले. तोपर्यंत पोलिसांनी दत्ता यांच्यावर लाठीमार चालू केला. त्याला प्रतिकार करत मी फौजी आहे, मला कां मारताय, असे विचारताच गाडीतील इतर पोलिस खाली उतरले आणि सर्वांनी मिळून मारहाण झाली. ही झटापट सुरू असतानाच दत्ता यांनी गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करण्याता आला. दत्ता यांची आई व पत्नी यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यादरम्यान, मी फौजी आहे, मला संचारबंदी माहिती आहे. मी कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेलेलो नाही तरी कां मारहाण करताय, असे दत्ता यांनी वारंवार विचारले तर तू फौजी बॉर्डरला, इथे काही नाही, असे उत्तर पोलिसांनी दिल्याचे दत्ता यांनी म्हटले आहे.

या मारहणीत दत्ता यांच्या अंगावर चार- पाच वळ उठले आहेत. पोलिस अतिशय वाईटपणे वागले आहेत. ते एका फौजीशी अशा पद्धतीने वागतात, ते सामान्य माणसांशी कशा पद्धतीने वागत असतील, असा माझा प्रश्न आहे. असा अतिरेक करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी असल्याचे दत्ता यांनी म्हटले आहे.
 

   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख