Mendosa is BJP"s target in Mira bhayender | Sarkarnama

मीरा भाईंदरमध्ये मेंडोसा  हेच भाजपचे लक्ष्य 

महेश पांचाळ : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 5 एप्रिल 2017

एकेकाळी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मेहता यांना मेंडोन्सा यांच्या कृपेने महापौर पद मिळाले होते. मेंडोन्सा यांना कधीही विसरणार नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या मेहता यांना भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी मेन्डोसा यांचे राजकीय प्रस्थ उद्‌वस्त करण्यासाठी डावपेच रचावे लागत आहेत.

मुंबई: मीरा भाईंदरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे राजकीय प्रस्थ खालसा करण्याचा इरादा भाजपने केला असून, आगामी महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांना भाजपत प्रवेश देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.

स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ऑगस्टमध्ये होणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेत शत: प्रतिशत भाजप आणणार असल्याचा दावा केला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेत भाजप आणि सेना ही युती सत्तेवर असून, आगामी सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये सेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे दिसून येत आहे.

गेले अनेक वर्षे मीरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादीचे माजी आमदार गिलर्ब्ट मेन्डोसा यांचे वर्चस्व होते. मेन्डोसा सध्या जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. मीरा भाईंदर महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी प्रबळ पक्ष मानला जात होता. सध्या स्थानिक पातळीवर नेता तुरुंगात असल्याने, राष्ट्रवादी पक्षांची ऑगस्ट महिन्यापूर्वी वाताहत होते का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी पक्षांच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील यांचे काही समर्थक नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. 95 सदस्य असलेल्या महापालिकेत 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे 29, शिवसेनेचे 14, राष्ट्रवादीचे 27, कॉंग्रेसचे 27, मनसे एक, अपक्ष आणि अन्य चार असे नगरसेवक होते. परंतु, चार महिन्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांतील बहुसंख्य नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सेना भाजपकडून केले जात असेल तरी, भाजपचे नरेंद्र मेहता यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फोडाफोडीच्या राजकारणावर भर दिला असल्याचे समजते. एकेकाळी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मेहता यांना मेंडोन्सा यांच्या कृपेने महापौर पद मिळाले होते. मेंडोन्सा यांना कधीही विसरणार नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या मेहता यांना भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी मेन्डोसा यांचे राजकीय प्रस्थ उद्‌वस्त करण्यासाठी डावपेच रचावे लागत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख