memories of R R patil | Sarkarnama

शिक्षकानं दिली आर. आर. आबांसमोर कबुली!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

राज्याचे उपमु्ख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची आज जयंती. सर्वसामान्यांमध्ये आबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर. आर. यांनी प्रशासनातही आपला दबदबा निर्माण केला होता. ते ग्रामविकासमंत्री असताना त्यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले प्रभाकर गावडे यांनी आबांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी नेहमीच इतर मंत्र्यांपेक्षा आपला वेगळा ठसा उमटवला. साधेपणा आणि कामात झोकून देण्याची त्यांची वृत्ती होती. ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी नर्मदा धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचा दौरा करण्याचे नियोजन केले. तब्बल तीन दिवस आबा या दुर्गम भागात मुक्कामाला होते. त्यातून यंत्रणेच्या अनेक त्रुटी लक्षात आल्या. या दौऱ्याच्या वेळी अनेक शाळांना शिक्षक नसल्याचे लक्षात आले. जे शिक्षक नेमले होते ते हजरच होत नव्हते, हे देखील आबांनी ताडले. आबा येणार म्हणून त्या दिवसापुरती यंत्रणा त्या गावात कामाला लागली होती. एका गावात गेल्यानंतर शिक्षक शाळेत उपस्थित असल्याचे दिसले. 

आबांनी त्या शिक्षकाची सर्वांसमक्ष मुलाखत घ्यायला सुरवात केली. त्याला खरे खरे सांगायला लावले. हा शिक्षक कधी येतो, कसा येतो, काय शिकवतो, असे अनेक प्रश्‍न त्याला विचारले. सगळ्या गावासमोर हा मुलाखतीचा कार्यक्रम चालू होता. आबांच्या प्रश्नांच्या माऱयानंतर हा शिक्षक खरे खरे सांगू लागला. तो म्हणाला की मी फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशीच शाळेत या आधी आलो होतो. पण आता यानंतर नियमित येईल, अशी कबुली त्याने दिली. आबांनी त्याला तंबी दिली. परत गैरहजर राहिला तर कारवाईचा इशारा दिला. जिल्ह्यातील दुर्गम गावांतील अशीच स्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सीईओंना आदेश दिला. मी वारंवार दौऱ्यावर येईल, असा इशाराही दिला. त्यांच्या या दौऱ्यानंतर नंदुरबारमधील शिक्षकांची उपस्थिती सुधारली. 

जिल्हा परिषदांचा कारभार हा आबांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय होता. या जिल्हा परिषदांना अधिकार मिळावेत, यासाठी स्वतः आबा नेहमी क्रियाशील राहिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी यासाठी सातत्याने आग्रह धरला होता. नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होते. त्या वेळी आबांनी नागपूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याचे कळाले. विधिमंडळातील कामकाज आटोपून ते थेट नागपूर जिल्हा परिषदेत शासकीय लवाजमा न घेता गेले. सभा सुरू असलेल्या हॉलमध्ये ते प्रेक्षकांमध्ये बसले. कोणालाही कळाले नव्हते की थेट ग्रामविकासमंत्री त्या बैठकीला उपस्थित आहेत ते. आबांनी शेजारी बसलेल्या व्यक्तीकडून तंबाखूही मागून खाल्ली. अर्ध्या तासानंतर आबा आल्याचे लक्षात आल्यानंतर झेडपीत धांदल उडाली. सभागृहातील चर्चा ऐकून आबांनी तेथील सदस्यांना आणखी काही सूचना केल्या. 

मिरचीचा ठेचा आणि बेसन आवडते पदार्थ 
त्यांची राहणी साधी होती. ते विश्रामगृहावर उतरले तरी त्यांना सरकारी लवाजमा आवडायचा नाही. तेथील जेवणाचे बिल ते स्वतः द्यायचे. त्यांचे आवडते पदार्थ म्हणजे कांदा, मिरचीचा ठेचा आणि बेसन. हा डबा घेऊन मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो आहे. ते विमानप्रवास टाळायचे. जास्तीतजास्त रेल्वेने प्रवास करायचे. त्यामुळे लोकांशी त्यांचा चांगला संपर्क यायचा. गावाकडे गाडीतून चालले तरी रस्त्यावर कोणी हात केला तरी थांबायचे. त्या व्यक्तिला गाडीत बसवून घ्यायचे. सर्वसामान्यांशी त्यांची नाळ नेहमी जोडलेली होती. म्हणूनच ते सर्वसामान्यांना आपले आबा वाटायचे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख