memories of atalbihari vajpeyi about pune | Sarkarnama

अटलजी म्हणाले होते.. पाकिस्तान के बिना हिंदुस्थान अधुरा है! 

योगेश कुटे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्या अनेक स्मृती जनतेच्या मनात दाटून आल्या आहेत. पुणे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा स्नेहबंध होता. अटलजी अनेक कार्यक्रमांसाठी पुण्यात आले होते. या कार्य़क्रमांतील या काही आठवणी

अटलबिहारी वाजपेयींच्या भाषणाची भुरळ न पडलेला भारतीय विरळा. सुमधुर हिंदी, त्यातील चढउतार, पॉजेस याने ते भाषण नटलेले असायचे. भाषण म्हटले तर आक्रमक पण कोठेही विरोधकांवर खालच्या शब्दांत वार नाही. अटलजींनी पॉज घेतला की पुढे काय कानी पडणार, याची उत्सुकता असायची. तरुण वयात तर त्यांची भाषणे ऐकायची संधी मिळाली तर ती सोडायची नाही, अशी परिस्थिती होती. ती संधी पुण्यात अधुनमधुन मिळायची.

अटलजी 1994 मध्ये  सलग तीन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यभूषण पुरस्कार अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खुद्द अटलजी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यभूषण पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आणि टिळक पुरस्कार वितरण समारंभ प्रथेप्रमाणे टिळक स्मारक मंदिरात झाला. दोन्ही कार्यक्रमांसाठी दोन्ही सभागृहे प्रचंड गर्दीने भरलेली होती. भाषणांची सुंदर मैफल या कार्यक्रमात ऐकायला मिळाली. 

वरचा मजला खाली आहे... 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयचे भाषण आजही स्मरणात आहे. "पुरंदरे यांनी हजारो भाषणे दिली आणि त्यांची भाषणे लोक पैसे देऊन ऐकायला येतात, हे खरोखरीच चकीत करणारे आहे. राजकीय नेत्यांच्या सभांना लोकांना निमंत्रणे दिले तरी श्रोते मिळत नाहीत. पण बाबासाहेबांची शिवाजींप्रती इतकी विचारनिष्ठा आहे की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही,'' अशा शब्दांत त्यांनी गौरव केला होता. 
या समारंभात आधीची सर्व भाषणे मराठीत झाली होती. त्यावर अटलजी म्हणाले की मला मराठी भाषा समजते. पण ती फार वळते. आमच्या इंदूरमध्ये, "एक जण वरचा मजला खाली आहे,' असे सांगत होता. वरचा मजला खाली कसा काय, हे मला आधी कळालं नाही. खाली याचा अर्थ रिकामा आहे, हे मला नंतर कळालं, असं त्यांनी सांगताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला होता. 

परराष्ट्र धोरणावर सुंदर विवेचन 

टिळक पारितोषिक प्रदान समारंभात अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. ते राजकीय काही तरी बोलतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र त्यांनी थेट देशाच्या परराष्ट्र धोरणावर बोलण्यास सुरवात केली. हा विषय का महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी सुरवातीचे प्रास्ताविक केले. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, हे सांगितले. इराणमध्ये भरलेल्या मुस्लिम देशांच्या परिषदेचा अनुभव त्यांनी या वेळी सांगितला.

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी या परिषदेसाठी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळ पाठविले होते. विरोधी पक्षनेता असूनही राव यांनी अटलजींची या परिषदेसाठी निवड केली होती. अटलजींनीही ती मोठेपणाने मान्य करत शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले होते. या परिषदेच्या कामकाजाबाबत अटलजींनी सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले की या परिषदेत पाकिस्तानाच्या प्रतिनिधीने नेहमीप्रमाणे काश्‍मीरचा विषय काढला. या प्रतिनिधीची इतपर्यंत मजल गेली की काश्‍मीर के बिना पाकिस्तान अधुरा है, असा युक्तिवाद त्याने केला. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर अटलजींनी त्याला तेथेच प्रत्युत्तर दिले. आप कहते है की काश्‍मीर के बिना पाकिस्तान अधुरा है लेकीन हम मानते है की पाकिस्तान के बिना हिंदुस्थान अधुरा है. हा अनुभव अटलजींनी सभागृहात ऐकवताच प्रचंड असा टाळ्यांचा कडकडाट झाला. 

सुरेश कलमाडींसाठी घेतली प्रचार सभा 
खासदार सुरेश कलमाडी यांना 1998 मध्ये कॉंग्रेसने पुण्यातून उमेदवारी नाकारली. कॉंग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी आणि कलमाडी यांचे कशावरून तरी बिनसले होते. त्यामुळे केसरी यांनी त्याचा वचपा तिकिट न देऊन काढला. कलमाडी यांनी मग पुणे विकास आघाडी स्थापन केली. भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांच्या प्रचार सभेसाठी अटलजींनी यावे, यासाठी कलमाडी यांनी जंग जंग पछाडले होते. वाजपेयी यांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले होते. तरी त्यांनी ते दुःख बाजून ठेवून कलमाडी यांच्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेतली. तेथे त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली होती. वाजपेयी यांनी सभेसाठी येऊ नये, असे अनेक निष्ठावंतांना वाटायचे. पण दिलेला शब्द मोडणे हे वाजपेयींच्या स्वभावात नव्हते. स्थानिक विरोध डावलून त्यांनी कलमाडींसाठी सभा घेतलीच. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख