मोदींच्या आवाहनावर 'हसावे की रडावे' हेच कळत नाही: इम्तियाज जलील 

जगभरातील देश कोरोनाच्या संकटाशी कसा मुकाबला करत आहेत आणि दुसरीकडे आपण मात्र टाळ्या थाळ्या दिवे टॉर्च मेणबत्त्या यातच अडकून पडलो आहोत. आपण देशाला कुठे घेऊन जात आहोत याचा विचार पंतप्रधान मोदी व त्यांच्या अंध भक्तांनी करण्याची वेळ आली आहे.
member of parliament imtiyaz jalil criticizes narendra modis video message
member of parliament imtiyaz jalil criticizes narendra modis video message

औरंगाबाद: . एप्रिलमध्ये लोक एकमेकांना 'एप्रिल फूल' करतात, पोलीस आणि प्रशासनाने यावेळी अशाप्रकारे कुणी कुणाला 'एप्रिल फुल' करणार नाही याची काळजी घेतली होती. परंतु मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून देशवासीयांना एप्रिल फूल केले असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी पंतप्रधानांच्या दिवे, बॅटरी, मोबाईलचा टॉर्च लावण्याच्या आवाहनावर टीका केली आहे. 

इम्तियाज जलील म्हणाले, आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ संदेश जारी झाला. मोदी पुन्हा देशाला उद्देशून काय सांगणार याची उत्सुकता माझ्यासह सर्व जनतेला लागली होती. कोरोनाचे संकट वाढलेले असताना देशातील आरोग्य सुविधांची परिस्थिती, लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची होत असलेली गैरसोय यावर सरकार काय उपाययोजना करणार? किंवा केल्या हे मोदीजी सांगतील असे अपेक्षित होते. परंतु देश एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा इव्हेंट घेत त्यात देशवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी उभारला जात आहे. देशातील मोठे उद्योजक रतन टाटा यांच्यासह सलमान खान, शाहरुख खान यांच्यासारख्या सिनेअभिनेत्यांकडून निधी दिला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार देशातील जनतेचे कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या आरोग्य सुविधा निर्माण करत असेल, ज्या गोरगरिबांचे लॉकडाऊनच्या काळात अन्नपाण्याशिवाय हाल होत आहेत त्यांच्यासाठी खास उपाययोजना करत असेल असे वाटले होते. पण देशाच्या पंतप्रधानांनी याआधी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला लावल्या, आता ते घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्त्या टॉर्च आणि दिवे लावण्यास सांगताहेत. त्यांच्या या आवाहनावर 'हसावे की रडावे' हेच कळत नाही. जगभरातील देश कोरोनाच्या संकटाशी कसा मुकाबला करत आहेत आणि दुसरीकडे आपण मात्र टाळ्या थाळ्या दिवे टॉर्च मेणबत्त्या यातच अडकून पडलो आहोत. आपण देशाला कुठे घेऊन जात आहोत याचा विचार पंतप्रधान मोदी व त्यांच्या अंध भक्तांनी करण्याची वेळ आली आहे.

'इथे वेडे राहतात'
मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला देशभरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, पण त्या दिवशी सायंकाळी रस्त्यावर उतरून भक्तांनी थाळ्या बडवत जो धिंगाणा घातला ते चित्र पाहून मान शरमेने खाली गेली. आता 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील विजेचे दिवे बंद करून मोबाईल, बॅटरी, टॉर्च व दिवे लावण्याचे मोदींनी केलेले आवाहन देखील त्यांचे भक्त पाळतील यात काही शंका नाही. पण योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखण्याची खरी गरज आजच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे.याउपरही लोकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर लोकांना आपल्या घरावर इथे वेडे राहतात अशा पाट्या लावाव्या लागतील, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com