युवक 'राष्ट्रवादी'च्या अध्यक्षपदी मेहबूब शेख - Meheboob Shaikh is the new NCP youth chief | Politics Marathi News - Sarkarnama

युवक 'राष्ट्रवादी'च्या अध्यक्षपदी मेहबूब शेख

संजय मिस्कीन 
मंगळवार, 4 जून 2019

मेहबूब शेख हे उच्चशिक्षित असून, उत्तम वक्ते आहेत. मुस्लिम समाजातील युवकाला युवक प्रदेशाध्यक्षपदाची पहिल्यांदाच जबाबदारी 'राष्ट्रवादी'ने दिली आहे. 

रविकांत वरपे, सूरज चव्हाण नवे कार्याध्यक्ष

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्या व सामान्य चेहऱ्यांना संधी देण्याची सुरवात केली आहे. युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मेहबूब शेख यांची आज निवड केली; तर प्रदेश कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांना संधी देण्यात आली.

मेहबूब शेख यांच्यासह चव्हाण व वरपे हे सामान्य कुटुंबांतील युवक आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तीन महिने युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मेहबूब शेख हे उच्चशिक्षित असून, उत्तम वक्ते आहेत. मुस्लिम समाजातील युवकाला युवक प्रदेशाध्यक्षपदाची पहिल्यांदाच जबाबदारी 'राष्ट्रवादी'ने दिली आहे. 

रविकांत वरपे हे सामान्य कामगाराच्या कुटुंबातील असून अभ्यासू व संघटन कौशल्य असलेले युवा नेतृत्व मानले जाते. राज्यभरात त्यांचा मोठा युवासंपर्क आहे. वरपे यांनी सुरवातीला काही काळ 'राष्ट्रवादी'च्या मीडिया सेलचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते पुणे येथील आहेत. 

तर सूरज चव्हाण हे लातूर जिल्ह्यातील असून, प्रदेश कार्यालयात ते समन्वयकाचे काम पाहतात.
आगामी विधानसभा निवडणुकांत नव्या युवा चेहऱ्यांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे मोठे आव्हान या तिन्ही युवा नेत्यांसमोर राहणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख